मराठवाड्यात पाण्‍यासाठी पहिला बळी, महिलेचा टँकरखाली दबून मृत्‍यू

औरंगाबाद | मराठवाड्यात दुष्‍काळस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. औरंगाबादेत पाण्‍यासाठी एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्‍याची धक्कादायक घटना घडली आहे. पाणी भरण्‍यासाठी गेलेल्‍या महिलेचा टँकर खाली दबून मृत्‍यू झाला आहे. फुलंब्री तालुक्‍यातील निमखेडा येथील गेवराई शिवारात जोशीवाडी वस्‍तीमध्‍ये शुक्रवारी ही दुर्घटना घडली. सुनिता हटकर असे मृत महिलेचे नाव आहे.

जोशी वाडीवस्‍तीमध्‍ये शासनाने अधिग्रहित केलेल्‍या विहिरीवर टँकरमध्‍ये पाणी भरण्‍यात येते. शुक्रवारी दुपारी 4 वाजता एक टँकर येथे पाणी भरण्‍यासाठी आले होते. या टँकरमधून गळणारे पाणी भरता यावे म्‍हणून सुनिता टँकरजवळ गेल्‍या. मात्र हे टँकर चिखलात रूतलेले असल्‍याने याचदरम्‍यान ते पलटी झाले. टँकर थेट सुनिता यांच्‍या अंगावरच पडले. यानंतर नागरिकांनी सुनिता यांना कसेबसे बाहेर काढत त्‍यांना तात्‍काळ रुग्‍णालयात दाखल केले. तेथे डॉक्‍टरांनी तपासून त्‍यांना मृत घोषित केले.

थेंब थेंब पाण्यासाठी नागरिकांना आतापासूनच ससेहोलपट करावी लागत आहे. त्यामुळे येणारे सहा महिने कसे जाणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मृत सुनिता हटकर.