‘विंडोज 7’चा सपोर्ट बंद करणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा

मुंबई | बहुतांश कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये वापरले जाणारे ‘विंडोज 7’ ऑपरेटिंग सिस्टीम कायमची बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. याचा अर्थ विंडोज 7 चे अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे. या दोन्हीमुळे संगणकाची सुरक्षा होत असते.

याऐवजी कंपनी Windows 7 Extended Security Updates विकणार आहे. ही सुविधा सुरु ठेवण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. अनेक व्यावसायिक कंपन्या अनेक वर्षांपासून विंडोज 7 चा वापर करत असल्यामुळे त्याचा वापर एकदम बंद करणे कठीण आहे. सामान्य ग्राहकांना हे अपडेट मिळणार नाहीत. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने Windows XP आणि Vista चाही सपोर्ट बंद केला आहे. 7 जुलै 2009 रोजी मायक्रोसॉफ्टने Windows 7 सादर केले होते. विंडोज 7 नंतर Windows 8 , Windows 8.1 आले. जुलै 2015 मध्ये Windows 10 लाँच करण्यात आले. सध्या विंडोज 10 वापरणाऱ्या यूझर्सची संख्या 70 कोटींहून जास्त आहे.