पुन्हा एकदा घासला जाणार अलादीनचा दिवा, निळ्या जिनीच्या रूपात चाहत्यांना भेटायला येतोय विल स्मिथ

मुंबई | अलादीन आणि त्याने दिवा घासल्यानंतर त्यातून प्रकटणारा जिनी यांची गोष्टी आपल्या प्रत्येकाच्याच मनाच्या कोपऱ्यात घर करून आहे. विविध टीव्ही शो आणि कार्टून्स तसेच कॉमिक्सच्या माध्यमातून आपल्याला हा जिनी भेटलेला आहे. आता डिस्ने पुन्हा एकदा त्याच जिनीची भेट घडवून आणणार आहे. विशेष म्हणजे जिनीच्या रुपात चाहत्यांना भेटणार आहे लाडका हॉलिवूड अॅक्टर विल स्मिथ.

डिस्नेच्या बहुचर्चित अलादीन चित्रपटाचा नवा ट्रेलर रविवारी रात्री ग्रॅमी अवॉर्ड्सदरम्यान रिलीज करण्यात आला. त्यातून अलादीन, जास्मिन आणि सर्वांच्या लाडक्या जिनींचे पात्र सर्वांना भेटले. त्यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरलाय जिनी. जिनीच्या रुपामध्ये चाहत्यांना भेटायला येत आहे प्रसिद्ध हॉलिवूड अॅक्टर विल स्मिथ. विल स्मिथने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रेलर रिलीज करून सर्व चाहत्यांना ही बातमी दिली. या ट्रेलरमध्ये अलादीन आणि जिनीसह चित्रपटातील इतरही अनेक महत्त्वाची पात्रे चाहत्यांना भेटायला आलेली आहेत.

डिस्नेचा अलादीन हा चित्रपट 27 वर्षांपूर्वी म्हणजे 1992 मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या रुपातील अलादीन आणि जिनी समोर आले आहेत. विल स्मिथशिवाय जास्मिनच्या रुपात नाओमी स्कॉट तर अलादीनच्या रुपात मेना मसॉद झळकणार आहेत. हा चित्रपट जगभरात कमाईचे विक्रम मोडणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.