बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात कोणाला उतरवणार भाजप, शिवसेनेच्या शिवतारेंची चर्चा

2

एएम न्यूज नेटवर्क | लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष राज्यातील प्रमुख जागांकडे लागलेले असते. मुंबई-पुण्यातील काही ठरावीक जागांचे निकाल काय लागणार हे सर्वांनाच माहिती असते. पण तरीही येथे उमेवार कोण, प्रचारात काय होणार याच्या चर्चा असतात. अशाच मतदारसंघांपैकी एक म्हणजे शरद पवारांचा बारामती मतदारसंघ. बारामतीमधून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणूक लढवतात. पण त्यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष असते. यंदा येथे शिवसेनेच्या विजयबापू शिवतारे यांचेही नाव चर्चेत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात सध्या तशी चर्चा आहे. पण बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघाच निर्णय भाजपच घेणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यात शिवतारे यांनीही आपल्या निवडणूक लढवण्याबाबत शिवसेना पक्ष निर्णय घेईल असे म्हटले आहे.

जानकरांनी दिली होती तगडी लढत

गेल्यावेळी मोदी लाटेवर स्वार होत रासपचे महादेव जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे या लाटेचा फायदाही त्यांना झाल्याचे पाहायला मिळाले. कारण बारामतीमधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात जानकरांनी अगदी तगडी फाइट दिली होती. सुप्रिया सुळेंना या निवडणुकीत अवघे 70 हजारांचे मताधिक्यच मिळवता आले होते. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा जानकरांचे कार्ड वापरण्याचा प्रयत्न करू शकते.