पुण्यात 2 नववधूंची कौमार्य चाचणी

कंजारभाट समाजातील लज्जास्पद प्रथा सुरूच

पुणे | दोन नववधूंची कौमार्य चाचणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात पुन्हा समोर आला आहे. 21 जानेवारीला कंजारभाट समाजातील 2 जोडप्यांचे कोरेगावमध्ये लग्न झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता जातपंचायतीने नववधूंची कौमार्य चाचणी घेतली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात कोरेगावमध्येच अशी घटना घडली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. धक्कादायक म्हणजे या दोन्ही घटनेतील वधू-वर हे उच्चशिक्षित आहेत.

अशी केली जाते कौमार्य चाचणी
कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या आधी आणि नंतर जातपंचायत भरवली जाते. लग्न झाल्यानंतर वधूची कौमार्यचाचणी घेतली जाते. त्यासाठी वधू-वराला एका अज्ञात ठिकाणी नेऊन चाचणीसाठी त्यांना एका खोलीत राहण्यास सांगितले जाते. खोलीबाहेर जातपंचायत भरवली जाते. त्यामधील एक सदस्य वराला ‘माल खरा मिळाला की खोटा?’ किंवा ‘तुझे समाधान झाले का?’ अशी विचारणा करतो. त्यानंतर खोलीतील खाटेवर टाकण्यात आलेल्या पांढऱ्या शुभ्र कापडावरील रक्ताचे डाग सर्व सदस्यांना दाखवले जातात. त्यानंतर जातपंचायत वधू शुध्द असल्याचे सांगतात. वराने उत्तर नकारार्थी दिले किंवा कापडावर रक्ताचे डाग आढळले नाही, तर वधू अशुद्ध असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर वधूच्या कुटुंबियांकडून दंड आकारला जातो व विवाहाला मान्यता दिली जाते.

प्रथेविरोधात तरूणांचा एल्गार
या प्रथेविरोधात कंजारभाट समाजातील तरूणांनीही कंबर कसली आहे. सोशल माध्यामांवर “stop the v ritual” हे अभियान तरूणांकडून राबवले जात आहे. त्याद्वारे कौमार्य चाचणीविरोधात जन जागृति केली जाते. त्याला सर्व स्तरातून पाठिंबाही मिळत आहे. मात्र यातील काही तरूणांना मारहाण करणे, त्यांना जाळीत टाकणे, असे प्रकारही समोर येत आहेत. तरूणांचे आंदोलन तसेच कायद्याच्या धाकामुळे हे प्रकार आता उघड-उघड होत नाही. मात्र ते बंद झालेत, असेही नाही. त्यांचे केवळ स्वरूप बदलले आहे. याबद्दल कंजारभाट समाजातील अधिकारी कृष्णा इंद्रकर यांनी सांगितले की, ‘पूर्वी माल खरा मिळाला की खोटा? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जायचे. आता मात्र ‘तू सात विहिरी ओलांडून गेलास, कसं वाटलं?’ असे प्रश्न विचारले जात आहेत.