राज्यभरात अवकाळी पावसाचे थैमान, पुण्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई | उन्हाळाच्या तोंडावर राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वरुणराजाच्या कृपेमुळे दिलासा मिळालाय. मात्र यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. मुंबई-ठाण्यासह धुळे, सातारा, पुणे, नाशिक, बीड,  नागपूर, मालेगाव आदी ठिकाणी अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे नुकसान झाले आहे. तर जुन्नर तालुक्यातील भोरवाडी येथे आज पहाटे 3 वाजता वीज अंगावर कोसळल्याने महेश दशरथ भोर या युवकांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.

औरंगाबादेत पावसाला सुरुवात 

औरंगाबादेत आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे सोसाट्याचा वारा वाहत होता. मात्र आज पावसाच्या सरी बरसत आहेत. कडक उन्हाळ्यामध्ये या पावसाच्या सरींनी परिसरात सुखद गावरा पसरला आहे.

नागपुरात पावसाला सुरुवात

भीषण ऊन आणि उकाड्या पासून आज नागपुरकरांना थोडा दिसाला मिळाला आहे. आज सकाळ पासूनच नागपूरमध्ये निसर्गाने आपला मूड बदलला आहे. सकाळ पासूनच नागपुर मध्ये रिमझिम पाऊस बरसत आहे. दररोज सकाळी नऊ वाजे पासूनच अंगाची लाही लाही करणारे ऊन नागपूरमध्ये असते. दररोज पारा चाळीशी पार असतो. रखरखत्या उन्हात जीव कासावीस होतो पण आज या सर्व त्रासापासून नागपूरकर जनतेची किमान आजच्यापुरती तरी सुटका झाली आहे.

नाशकात झाड पडल्याने दोन जखमी

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालूक्यात रात्री आचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या आवकाळी पावसात दोन ठिकाणी वृक्ष पडल्याने दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. मनपा आयुक्तांच्या बंगल्या शेजारील एक झाड पडल्याने एक व्यक्ती जखमी झाली आहे. तर दुसरीकडे टेंशन चौकातील एक झाड पडल्याने अजून एक व्यक्ती जखमी झाली आहे.

पुण्यात आठवडी बाजाराचे मोठ्याप्रमाणात नुकसान

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे वादळी वारा गारांच्या पाउस झाला. यावेळी आठवडे बाजारात भाजीविक्रेत्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तळेगाव ढमढेरे गावात दर सोमवारी आठवडे बाजार भरला जातो. दौंड, श्रीगोंदा, हवेली, शिरूर, पुणे, नगर येथून व्यापारी मोठ्या प्रमाणात या आठवडे बाजारात पालेभाज्या, फळभाज्या, कापड दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, आदी व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी येत असतात. मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. संध्याकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला. साधारण सव्वा तास चाललेल्या पावसाने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचे तंबू तुटून पडले तर विक्रीस आणलेला माल पावसाच्या पाण्यात भिजल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

शिरुर अनंतपाळ येथे फळांच्या बागांचे नुकसान

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील तळेगांव (दे) येथे सोमवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटात व विजांच्या कडकडाटात तुरळक थेंबाबरोबर वादळी वाऱ्याने हजेरी लावली. या वादळाने आंबा फळाचे नुकसान केले असून शेतकरी बसवंत निवृत्ती सुर्यवंशी यांच्या घराजवळील शेतातील बांधावरील कडूलिंबाच्या झाडावर विज कोसळली आहे. यात सुदैवाने जीवीत हानी झाली नाही पण जनावरांचा चारा असलेल्या ऊसाच्या वाड्याची गंजी जळून खाक झाली आहे.

जुन्नर येथे वादळी वाऱ्यासर विजांचा कडकडाट

अवकाळी पावसामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होऊन दुर्घटना घडत आहेत. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील सदगुरुनगर-माळी मळा येथे नारळाच्या झाडावर विज कोसळल्याने संपुर्ण झाड जळून खाक झाले. मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवीतहानी झाली नाही.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातील माळी मळा येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास पावसाचे वातावरण झाल्यानंतर काहीच वेळात विजांचा कडकडाट सुरु झाला. यावेळी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असताना अचानक वीज नारळाच्या झाडावर पडली यावेळी या परिसरातील महिलांनी हा सर्व थरार आपल्या डोळ्यांनी पाहिला. तर नारळाच्या झाडावर पडलेल्या विजेमुळे संपूर्ण नारळाचे झाड जळून खाक झाले.