दगाफटका होणार नाही, उद्धव ठाकरे यांनी सुजय विखेंना दिला विश्वास, पवारांना मारला टोमणा

3

मुंबई | भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या सुजय विखे पाटील यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना किंवा भाजपकडून कोणताही दगाफटका होणार नसल्याचा विश्वास सुजय यांना दिला. त्याचबरोबर आम्ही इतरांच्या मुलांचा धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करून घेत नाही, त्यांचाही लाड करतो असा टोमणाही त्यांनी पवारांना मारला.

सुजय विखेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आमच्या मुलांचा लाड करतो त्याचप्रमाणे इतरांच्या मुलांचाही लाड करतो. त्यांना केवळ वापरून घेत नाही, असे म्हणत त्यांनी पवारांना टोमणा दिला. आम्ही जे करायचे ते थेट केले आहे, पाठीमागून वार केलेला नाही, असेही उद्धव यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम..

आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांनाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर कधीही कोणताही निर्णय लादला नाही. त्याचप्रमाणे मीही आदित्यवर काहीही लादणार नाही. निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय आदित्य स्वतःच घेईल. पण यावेळी तरी तो निवडणूक लढवणार नसल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले.

उमेदवारांची यादी तयार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार आहे. ही यादी एक दोन दिवसांत जारी करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.