56 पक्षच काय 56 पिढ्या मैदानात उतरल्या तरी भगवा फडकणार, उद्धव ठाकरेंचा घणाघात

परभणी | लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम पेटला आहे. राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा कसून समाचार घेतला. 56 पक्षच काय 56 पिढ्या मैदानात उतरल्यातरी भगवा फडकणारच असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. परभणी येथील सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, परभणीसह मराठवाड्यात शिवसेनाप्रमुखांनी पेरलेल्या बीजांना आता धुमारे फुटले आहेत. परभणीत तर भगव्याचा बालेकिल्ला राहिला आहे. विरोधकांना माझे खुले आव्हान आहे. 56 पक्षच काय 56 पिढ्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी हा भगवा फडकणारच, असा विश्‍वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.

शरद पवार, राहुल गांधीवर सडकून टीका

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शरद पवार व राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. सत्तेत असतांना दुष्काळग्रस्तांच्या चारा छावण्यासह शेण घोटाळा करणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता शेतक-यांचा कळवळा येवू लागला आहे, असे म्हणत त्यांनी शरद पवारांना टोला लगावला. उस्मानाबादमध्ये शरद पवार यांनी चारा छावणीला भेट दिली होती. याचा समाचार उद्धव ठाकरेंनी घेतला. आमच्या भगव्यात जोश व उत्साह आहे, तो तुमच्या फडक्यात नाही. आघाडी करताय करा परंतु भगव्याच्या, हिंदूत्वाच्या व मोदींच्या द्वेषाने करू नका. कारण आमचा जोश व तुमचा द्वेष दिसून आला आहे. हाच जोश देशाला सांभाळल्या शिवाय राहणार नाही, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

युती शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागवणार

भाजपाशी केलेली युती हे शेतक-यांचे प्रश्‍न मार्गी लावणारी ठरली आहे, शेतकरी हिताचे निर्णय व योजनांच्या अंमलबजावणीचे काम सुरू झाले आहे. पीकविम्यासाठी रस्त्यावर उतरून न्याय मागणारे खासदार पुन्हा दिल्लीचे तख्त राखण्यासाठी पाठवायचे आहेत. त्याचवेळी कर्मदरिद्रींना खड्यात घालण्यासाठी ही युती अभेद्यपणे राहणार आहे, उद्धव ठाकरे म्हणाले. राहूल गांधी व शरद पवारांच्या घोटाळ्याचे पुस्तक पाच वर्षांपूर्वी काढले होते. हेच घोटाळेबाज आज आमची लाज काढायला निघाले आहेत. स्वतः दरोडेखोर असतांना दुस-यांना चोर ठरविणा-यांनाच लाज का वाटत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.