शेतकरी संकटात, मुख्‍यमंत्री मात्र निवडणूक प्रचारात व्‍यग्र; उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई | शेतक-यांच्‍या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍यावर टीकास्‍त्र सोडले आहे. दुष्‍काळाच्‍या वणव्‍यात शेतकरी होरपळत असताना मुख्‍यमंत्री स्‍वत: धुळे महापालिका प्रचारात व्यग्र आहेत, अशी टीका त्‍यांनी सामनाच्‍या अग्रलेखातून केली आहे.

महाराष्ट्र दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. मुख्यमंत्री स्वतः धुळे महापालिका प्रचारात व्यग्र आहेत. राज्याच्या इतर मंत्र्यांनाही धुळे महापालिकेचे प्रभाग नेमून दिले आहेत. देशाचे संरक्षण राज्यमंत्री असलेले सुभाष भामरेही सध्या धुळ्यातच मुक्कामी आहेत. म्हणजे ‘जवान’ आणि ‘किसान’ यांना वार्‍यावर सोडून पालिकांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत आमचे राज्यकर्ते गुंतले आहेत, अशी टीका उद्धव यांनी केली आहे.

फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी प्रचंड घोषणाबाजी केली, पण शेतकरी मरणपंथाला लागला आहे. केंद्रीय दुष्काळ पथकाला महाराष्ट्रात ‘बॉडीगार्ड’ घेऊन फिरावे लागत आहे. ज्या वाटेवरून सरकार आले त्याच वाटेवर आता सुरुंग पेरले आहेत, असा हल्‍लाबोल त्‍यांनी भाजप सरकारवर केला.

शिवसेना सरकारवर ऊठसूट टीका करते, सरकारात राहून कारभाराचे वाभाडे काढते, असे ज्यांना वाटते त्यांनी केंद्रीय पथकासमोर शेतकर्‍यांनी मांडलेल्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. केंद्रीय पथकाशी शिवसेनेचा संबंध नाही व किसन वारे (वय 67) सारखी मंडळी शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत. आम्ही जगायचे कसे? हा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना भेडसावत आहे. पावसाअभावी कापूस जळून गेला. एकरी पाच-सहा हजार खर्च झाला, पण हाती काहीच लागले नाही. अडीच टन कांदा विकून हाती मुद्दलही लागत नाही. उलट कांदा उत्पादकाच्या खिशातला पैसा संपत आहे. शेतात राबायचे, अस्मानी-सुलतानी आव्हानांना तोंड देत पीक काढायचे आणि जेव्हा ते विकून उत्पन्न मिळवण्याची वेळ येते तेव्हा शेतमालास कवडीमोल भावाने विकण्याशिवाय शेतकर्‍यासमोर पर्याय राहत नाही, अस उद्धव ठाकरेंनी म्हटल आहे.

संजय साठे या निफाडच्या शेतकर्‍याने काय केले? निफाड बाजार समितीत कांद्याला प्रति किलो फक्त एक रुपया चाळीस पैसे भाव मिळाल्याने त्रासलेल्या संजय साठे यांनी साडेसात क्विंटल कांद्याचे एक हजार चौसष्ट रुपये पंतप्रधान निधीला पाठवले. संपूर्ण राज्याचे हे चित्र आहे. आता या शेतकर्‍याचा कांदाच कसा फालतू दर्जाचा होता हे सिद्ध करण्यासाठी सरकारी यंत्रणा धडपड करीत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. सरकार चालवायला जेथे शिर्डी संस्थानकडून कर्ज घ्यावे लागले तेथे शेतकर्‍यांचे प्रश्न कसे सोडवणार?, असा सवाल त्‍यांनी या अग्रलेखातून केला आहे.