‘मोदी सरकारनं लोकांचा केसानं गळा कापला’, पार्थ पवारांच्या सभेत उदयनराजेंची चौफेर टीका

पुणे । पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनाला जनता फसली. तरुणांना रोजगार देऊ, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू, अशा अनेक घोषणा मोदींनी केल्या होत्या. त्यावर विश्वास ठेवून लोकांनी प्रचंड बहुमतांनी त्यांना सत्ता दिली. मात्र, यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. लोकांनी विश्वास ठेवला ही त्यांची चूक झाली. भाजप-शिवसेना सरकारने केसांनी लोकांचा गळा कापला असल्याचा घणाघाती टीका सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारानिमित्त निगडी प्राधिकरण येथे उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या सुरुवातीलाच साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहुचर्चित असलेली ही सभा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, शब्दाला पक्के असणारे उदयनराजे नऊ वाजण्याच्या सुमारास सभेच्या ठिकाणी हजर झाले. यावेळी पाऊस होऊनही उदयनराजे यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांनी फक्त ‘मन की बात’ केली. एवढा मोठा अभिनय मी कधीच बघितला नव्हता. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन जनतेची त्यांनी फसवणूक केली. लोकांनीदेखील त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिले. मात्र, सत्तेत विराजमान झाल्यानंतर त्यांनी जनतेकडेच पाठ फिरवली. ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका त्यांनी घेतली. जनता हाच लोकशाहीतला राजा आहे. पाच वर्षांत या सरकारने देशाची काय अवस्था केली आहे. अनेक जवान शहीद झाले. मग लोकशाहीतले राजे आज गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की, यांना फक्त तुमची मते हवी आहेत. तुमची किंमत त्यांना कळत नाही. शिवरायांना जशी जनतेची किंमत होती, तसेच तुमची किंमतदेखील आम्हाला आहे. आता यांची भरसभेत भांडणे सुरू आहेत. काय यांच्याकडून अपेक्षा करायची. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत अशी बोचरी टीका राजेंनी केली…! मी म्हणजेच पार्थ पवार असं समजून मतदान करा, असं आवाहनही उदयनराजे यांनी या वेळी उपस्थितांना केले.