विहिरीचे खोदकाम चालू असताना दोन तरुण मजुराचा मृत्यू

2

चिखली | तालुक्यातील गांगलगाव येथे विहिरीत काम करीत असताना दोन मजुरांचा विहिरीतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विहिरीवर काम करत असतांना अचानक क्रेनचे साबडे तुटून विहिरमध्ये पडल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गांगलगाव येथे घडली.

गांगलगाव येथील रहिवाशी असलेले महादू म्हस्के यांच्या मालकीच्या आंबाशी शिवारातील शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. या विहिरीमध्ये खोदकाम ठेकेदार रमेश म्हस्के हे होते. ते मजुरांकडून काम करून घेत होते. नेहमीप्रमाणे गावातील विहिरीवर काम करणारे मजूर विहिरीवर काम कारणासाठी गेले आणि साबडाने विहिरीत जात असतांना क्रेनच्या साबडाचे वायर रोप तुटून विहिरीत पडले यामध्ये अपघातात दोन तरुण मजुरांचा मृत्यू झाला आहे.

अमोल रामशिंग निंबोळे (30) असे जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर सोलकी(32) यांचा उपचारादरम्यान चिखली येथील डॉ. जवंजाळ रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आढेरा ठाणेदार विनायक कारेगावकर यांच्या मार्गदर्सनाखाली बिट अंमलदार पोफळे यांनी पंचांसमक्ष पंचनामा करून गजानन म्हस्के यांच्या तक्रारीवरून ठाणेदार कारेगावकर यांनी आरोपी रमेश पुंडलिक म्हस्के आणि विनोद रमेश म्हस्के यांचावर गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास पोफळे करत आहेत.