शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज परभणीत, संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सभा

परभणी । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी (दि.15) शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्टेडियमवर सायंकाळी पाच वाजता ही सभा सुरू होणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार व परभणी लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राज्यमंत्री संजय राठोड तसेच महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेल्या संजय जाधव यांना 5 लाख 78 हजार 455 मते मिळाली होती. त्याखालोखाल राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना 4 लाख 51 हजार 300 मते मिळाली होती. या निवडणुकीतही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच टक्कर होणार आहे. फक्त यावेळी राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. विटेकरांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क असल्याचे बोलले जाते. परभणी लोकसभेसाठी तीन दिवसांनी 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 23 मे रोजी निकाल लागल्यावर शिवसेनेला गड राखण्यात यश मिळते का हे स्पष्ट होईल.