मुंबईत IPL खेळाडूंवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, मुंबई पोलिसांना हायअलर्ट

मुंबई । आयपीएल खेळाडूंवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती विविध मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयपीएल खेळाडूंवर हॉटेल, रस्ते आणि पार्किंगमध्ये हल्ला होऊ शकतो, अशी माहिती एटीएसने पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीत समोर आली आहे. दहशतवादी एटीएसच्या चौकशीत म्हणाले की, त्यांनी ट्रायडंट हॉटेलपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत रेकी केली होती. ही माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलिस अलर्ट झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या बंदोबस्त शाखेला अलर्ट राहण्याच्या आणि खेळाडूंची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल खेळाडूंवर दहशतवादी हल्ल्याच्या भीतीमुळे त्यांच्या बससोबत एस्कॉर्टसाठी माक्समॅन कॉम्बॅट वाहनाचाही वापर करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय हॉटेल आणि स्टेडियममध्येही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कोणत्याही खेळाडूला सुरक्षेविना बाहेर न जाण्याची सूचना केली आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमधील एका मशिदीत गोळीबार झाला होता. या हल्ल्यातून बांगलादेश क्रिकेट टीमचे खेळाडू बालंबाल बचावले होते. तेव्हा एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यात हे खेळाडू आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत होते.

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा संस्थांनी अलर्ट दिलेला होता. आता निवडणुकांचाही काळ सुरू आहे. या दृष्टीने आयपीएलवरील दहशतवादी हल्ल्याच्या सावटाकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने पाहत आहे.