मतदानाच्या 5 दिवसआधी प्रकाश आंबेडकर – सुशीलकुमार शिंदेंची पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट, राजकीय चर्चांना उधाण

सोलापूर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी असताना झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, ही भेट अचानक झाली असे सांगण्यात आले आहे.

शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे प्रकाश आंबेडकर यांना भेटले, असं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर झालेल्या या भेटीने शहरात राजकीय चर्चा रंगत आहेत.

बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांनी एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. या काही मिनिटांच्या भेटीमध्ये राजकारणाचा विषय झाला नाही असे सांगण्यात आले. सोलापूर येथून सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची लढत होणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी सोलापूरसह अकोल्यातूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या कट्टर प्रतिस्पर्धकांच्या भेटीमुळे राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.