राहुल गांधींचे ‘चौकीदार चोर है’ हे वक्तव्य, सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

नवी दिल्ली | राफेलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी अडचणीत सापडले आहेत. ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्यानंतर सुप्रीम कोर्टाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना नोटीस बजावली आहे. भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी 23 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात राहुल गांधींविरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने राफेल डीलसंबंधी निर्णयावर पुनर्विचार याचिका मंजूर केली होती. राफेल डीलमध्ये ‘चौकीदार मोदी चोर हैं’ असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. असे राहुल गांधी म्हणाले होते. याच वक्तव्याविषयी भाजप खासदार मीनाक्षी लेखी सुप्रीम कोर्टात पोहोचल्या होत्या. त्यांनी कोर्टाच्या अवमानाचा आरोप लावला होता.

सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. यादरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, आम्ही असे वक्तव्य कधीच दिलेले नाही. याप्रकरणी आम्ही संपूर्ण स्पष्टीकरण मागणार आहोत. कोर्टाने स्पष्ट केले की, कोर्टाविषयी जे विचार माध्यमांमध्ये आले आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन आम्ही स्पष्टीकरण मागणार आहोत. आम्हाला आशा आहे की, राहुल गांधी या वक्तव्यावर आपले स्पष्टीकरण देतील.

राहुल गांधी प्रत्येक प्रचारसभेत, भाषणात ‘चौकीदार चोर है’ हा नारा लावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल व्यवहारात घोटाळा केला आहे आणि अनिल अंबानीला जवळपास 30 कोटींचा फायदा करुन दिल्याचा आरोप राहुल गांधींनी लावला आहे.