महिनाभरात 453 कोटी भरा अथवा तुरुंगात रवानगी, अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका

2

नवी दिल्ली | अनिल अंबानींच्या आरकॉम विरुद्ध सोनी एरिक्सन खटल्यात सुप्रीम कोर्टाने अनिल अंबानींना दणका दिला आहे. अनिल अंबानी आणि त्यांच्या दोन संचालकांनी कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन केले असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. चार आठवड्यांच्या आत 453 कोटी रुपये दिले नाहीत तर तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

एरिक्सन कंपनीने 550 कोटींच्या थकबाकी प्रकरणी अनिल अंबानींच्या आर कॉमला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने 15 डिसेंबरपर्यंत ही रक्कम देण्याचे आदेश दिले. पण पैसे मिळाले नसल्याने एरिक्सनने कोर्टात धाव घेतली. अनिल अंबानींच्या कंपनीने पैसे देण्याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करूनही पैसे दिले नाही हा कोर्टाचा अवमान असल्याचे एरिक्सनने म्हटले होते. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटले की, अंबानींच्या कंपनीने हे मुद्दाम केले आहे. चार आठवड्यांत 453 कोटी रुपये देण्याचा आदेश देत पैसे दिले नाही तर 3 महिन्यांच्या तुरुंगवासाचा आदेश सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे.

सुप्रीम कोर्टाने अनिल अंबानी आणि त्यांच्या दोन संचालकांना प्रत्येकी एक कोटींचा दंडही ठोठावला आहे. एका महिन्याच्या आता हा दंड भरण्यात आला नाही तर त्यासाठी एक महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या प्रकरणी 13 फेब्रुवारीला सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.