श्रीसंतवरील आजीवन बंदी हटली, पुनर्विचार करून तीन महिन्यांत निर्णय देण्याचे सुप्रीम कोर्टाचे BCCI ला निर्देश

2

स्पोर्ट्स वर्ल्ड | आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी क्रिकेटपटू श्रीसंतला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. श्रीसंतवर क्रिकेट खेळण्यास घातलेली आजीवन बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने पुनर्विचार करावा असे सुप्रीम कोर्टाने सुचवले आहे. तीन महिन्यांत बीसीसीआयने याबाबत निर्णय घ्यावा असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयला कोणत्याही खेळाडूवर अनुशासनात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. पण आजीवन बंदीची शिक्षा खूप जास्त असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयने श्रीसंतला दोषी ठरवण्याबाबतच्या निर्णयात हस्तक्षेप केलेला नाही. शिस्तपालन समितीने तीन महिन्यांत कारवाईबाबत निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले.

श्रीसंतवर 2013 मध्ये आयपीएलच्या एका मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर श्रीसंतवर बीसीसीआयने क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घातली होती. या बंदीमुळे श्रीसंतला क्रिकेटच्या कोणत्याही मैदानावर उतरता येत नव्हते. त्यामुळे श्रीसंतने या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली होती.