महाराष्ट्रात डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा

सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली | महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारच्या कायद्यातील काही अटींना मान्यता दिली, तर काही रद्द करत डान्स बारवरील बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत महाराष्ट्रात डान्स बार सुरु राहणार आहेत. यामुळे बारबालांना पुन्हा रोजगार मिळण्याची आशा याचिकाकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केली आहे. तर संपूर्ण निकाल वाचल्यानंतर पुढील कारवाईबाबत विचार करू, असे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले आहे.

नैतिकतेचे मापदंड काळानुसार बदलतात : सुप्रीम कोर्ट
काही प्रकारांना समाजातील प्रत्येक व्यक्ती अनैतिकच मानतो. यात जुगार, वेश्या व्यवसाय आदींचा समावेश आहे. मात्र लक्षात घेतले पाहिजे की, कोणत्याही समाजात नैतिकतेचे मापदंड हे काळानुसार बदलत असतात. काही दशकांपूर्वी जे अनैतिक समजले जायचे ते आताही अनैतिक असावे असे नाही. बार डान्सही त्यापैकीच एक आहे. मात्र अश्लीलता ही अनैतिकच आहे. अश्लील डान्स मान्य असू शकत नाही. राज्य सरकारचा अश्लील डान्सवर बंदी आणणारा कायदा योग्यच आहे.

नवे नियम

महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत डान्स बार सुरु राहणार

-डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम सुप्रीम कोर्टाकडून रद्द

-बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अट शिथिल

-बारबालांना टीप देण्यास परवानगी मात्र बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत

-बारबालांना डान्स बारमध्ये अश्लील नृत्य करण्यास मज्जाव

-डान्स बारमध्ये दारु पिण्यावर राज्य सरकारने घातलेली बंदी उठवली

-डान्स बार हे धार्मिक स्थळे आणि शाळा यापासून किमान एक किलोमीटर दूर ठेवण्याची अटही मागे