मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजप प्रवेश, म्हणाले-आई-वडिलांच्या इच्छेविरोधात घेतला निर्णय

2

एएम न्यूज नेटवर्क | राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय विखेंनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आता दक्षिण अहमदनगरमधून सुजय विखे भाजपचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

आई वडिलांचा विरोध पत्करून घेतला निर्णय

यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले की, मी माझ्या वडिलांच्या इच्छेच्या विरोधात हा निर्णय घेतला. यामध्ये माझे आई-वडील मला किती पाठिंबा देतील ते माहिती नाही. पण मी भाजपच्या नेतृत्वात चांगले काम करम्याचा प्रयत्न करमार आहे. मुख्यमंत्री आणि भाजपचे इतर आमदार नेते यांनी सहकार्य केले आणि निर्णय घेण्यासाठी मदत केली.

राहुल गांधींच्या प्रयत्नांनाही अपयश?

राहुल गांधी स्वतः सुजय विखे यांना अहमदनगरची जागा मिळावी म्हणून मध्यस्थी करत असल्याच्या चर्चा होत्या. पण शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अहमदनगरची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विखेंना समजावण्याचे सर्व प्रयत्न संपल्याने आज दुपारी विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा नाही

सुजय विखेंना उमेदवारी मिळवून देण्यात काँग्रेसला अपयश आल्याने राधाकृष्ण विखे पाटीलही नाराज असल्याची चर्चा होती. पण राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजीनामा देण्याचा आपला विचार नसल्याचे विखे पाटील म्हणाले आहेत. सुजयच्या भाजप प्रवेशाबाबत पक्ष नेतृत्वाला माहिती दिली आहे. मी काँग्रेसमध्येच असणार आहे आणि पक्ष सांगेल ती भूमिका घेणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.