राज ठाकरे यांचा ‘टूरिंग टॉकीज’चा शो होता, जुन्याच फिल्म दाखवल्या : विनोद तावडे

मुंबई | सोमवारी राज ठाकरे यांची सोलापुरमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप सरकारची पोलखोल केली. डिजिटल गाव म्हटल्या जाणाऱ्या हरसाल या गावाची सत्य परिस्थिती राज ठाकरे यांनी जगासमोर मांडली. सरकारने केलेली जाहीरात ही फसवी होती हे त्यांनी पुराव्यासह सादर केले. यानंतर आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे यांचा ‘टूरिंग टॉकीज’चा शो होता, त्यांनी जुन्याच फिल्म दाखवल्या असा टोला विनोद तावडे यांनी लगावला आहे.

ठाकरे यांनी ‘टूरिंग टॉकीज’चा शो होता, त्यांनी जुन्याच फिल्म दाखवल्या

सोमवारच्या सोलापुरच्या सभेत राज ठाकरे यांनी देशातील पहिले डिजिटल गाव म्हटल्या जाणाऱ्या हरसालची खरी परिस्थिती सर्वांसमोर मांडली. यामध्ये त्यांनी त्या जाहिरातीतील लाभार्थी मुलालाही जनतेसमोर उभे केले. भाजपला चांगलेच झोडपून काढले होते. यावर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंचा काल टूरिंग टॉकीजचा शो होता, त्यांनी सगळ्या जुन्याच फिल्म दाखवल्या. यामध्ये तेच जुने शो, जुने मुद्दे, जुने आरोप असल्याचे वक्तव्य विनोद तावडेंनी केले आहे.

पवार आणि ठाकरेंच्या भेटीत गुफ्तगू होते आणि मग स्क्रिप्ट ठरते

राज ठाकरेंची सोमवारी सोलापुरात सभा झाली. त्यानंतर उस्मानाबादची सभा आटोपून शरद पवारही सोलापुरात दाखल झाले. यावेळी या दोघांनी एकाच हॉटेलमध्ये मुक्काम केला. यावरही विनोद तावडे बोलले आहेत. राज ठाकरे-शरद पवारांच्या भेटीमध्ये गुफ्तगू होते आणि मग भाषणाची स्क्रिप्ट ठरते. असे म्हणत विनोद तावडेंनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

योजना फसव्या आहे तर लोक आम्हाला मतं का देतात

विनोद तावडे म्हणाले की, या सर्व योजना फसव्या असतील तर मग लोक निवडणुकांमध्ये भाजपला मतं का देतात हे मनसेने तपासावे. जर योजना फसल्या असत्या, आम्ही थापा मारल्या असत्या तर त्यांनंतर झालेल्या सर्व निवडणुका, ग्रामपंचायत, महापालिका या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले नसते. भाजप जिंकत जाते आणि मनसे का संपत जाते हे राज ठाकरे यांनी तपासया हवे.

राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोण देणार

राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांच्या खर्चाचा हिशोब मागतात. मात्र नरेंद्र मोदी हे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या सभांचा खर्च पक्ष करेल. मात्र राज ठाकरे हे कोणत्याही पक्षाचे स्टार प्रचाराक नाही. आम्ही राज ठाकरेंच्या सभांचा हिशोब मागितलेला नाही. मात्र त्यांच्या सभांचा खर्च काँग्रेस करते की, राष्ट्रवादी करते हे पाहायचं आहे. असेही तावडे म्हणाले. तसेच समज नसल्यावर असे वक्तव्य बाहेर येतात असा टोलाही विनोद तावडेंनी राज ठाकरे यांना लगावला आहे.