राहुल गांधींचे शस्त्र व्यापाऱ्यांशी संबंध, त्यांना संरक्षण क्षेत्रातील व्यवहारांबाबत एवढी रुची का? -स्मृती इराणी

3

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधींसह संपूर्ण गांधी कुटुंब भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याची टीका केली. रॉबर्ट वाड्रा हे फक्त भ्रष्टाचाराचा चेहरा आहे, त्यामागे राहुल गांधी यांचाही संबंध असल्याचा आरोपही स्मृती इराणी यांनी केला. या पत्रकार परिषदेत स्मृती इराणी यांनी आरोप केला की, ईडीच्या छाप्यात राहुल गांधी यांचे काही वादग्रस्त लोकांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

काय म्हणाल्या स्मृती इराणी…

>> विविध संस्थांमध्ये भ्रष्टाचार हे 70 वर्षांपासून काँग्रेसनेच केले आहे. पण गेल्या 24 तासांत ज्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यावरून गांधी-वाड्रा कुटुंबाने कौटुंबिक भ्रष्टाचाराची व्याख्या तयार केल्याचे दिसून आले आहे.
>> सूत्रांच्या माध्यमातून देशाला समजले आहे की, एच. एल. पाहवा नावाच्या व्यक्तीकडे ED च्या छाप्यात त्यांचे राहुल गांधींबरोबर व्यवहार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.
>> जमीन खरेदीशी संबंधित या दस्तऐवजांवरून समोर आले आहे की, एच. एल. पाहवा यांच्याबरोबर राहुल गांधींचे आर्थिक संबंध आहेत.
>> एच. एल. पाहवा यांच्या येथे झालेल्या रेडमध्ये समोर आलेली आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्याकडे जमीन खरेदीसाठी पैसे नव्हते. राहुल गांधी आणि श्रीमती वाड्रा (प्रियंका गांधी) यांच्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी सी. सी. थंपी यांनी 50 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले होते.
>> यूपीए सरकारच्या काळात संरंक्षण क्षेत्राशी आणि पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित व्यवहारांमध्ये संजय भंडारी आणि सी. सी. थंपी यांचे कनेक्शन आहे. या व्यवहारांच्या चौकशीवरून लक्षात येते की, भाऊजीबरोबर मेहुणेही (राहुल गांधी) कौटुंबिक भ्रष्टाचारात सामील आहेत.
>> समोर आलेल्या नव्या माहितीनुसार राहुल गांधी आणि शस्त्रास्त्रे व्यावसायिक संजय भंडारी यांच्यात संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
>> या संबंधांवरून असे समोर आले आहे की, देशाच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवहारांमध्ये राहुल गांधींचा हस्तक्षेप हा त्यांच्या वैयक्तिक राजकारणाचा भाग तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांचे व्यावसायिक हित आणि त्यांच्या कुटुंबाचे हित याचाही त्यात समावेश आहे.
>> राहुल गांधी स्वतः आता रॉबर्ट वाड्रांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत.
>> आता राहुल गांधींनीच सांगावे की, संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवहारांत त्यांना एवढी रुची का आहे?
>> देशाची सुरक्षा ही केवळ ठराविक रुपये किंवा जमिनीसाठी बळी चढवण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला आहे का, हे त्यांनी सांगावे.
>> राफेल फाइल्सच्या संदर्भात संजय भंडारी यांचा सहभाग हा फाइल्समधील डॉक्युमेंटची चोरी कशी झाली आणि माहिती संरक्षण क्षेत्रातील दलालांना पुरवण्यामध्ये असल्याचे समोर आले आहे.
>> संजय भंडारी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा लंडनमधील बेहिशेबी मालमत्तेच्या संदर्भात एकमेकांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.