न्यूझीलंड : दोन मशिदींमध्ये अंदाधुंद गोळीबारात 49 बळी; 10 गंभीर जखमी, चार जणांना अटक

3

न्यूझीलंड | साऊथ आइसलंड सिटीच्या दोन मशिदींमध्ये माथेफिरुंनी केलेल्या गोळीबारात 49 जण ठार झाले आहेत. तर जखमींपैकी 10 पेक्षा जास्त लोक गंभीर आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी हा हल्ला म्हणजे न्यूझीलंडच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या क्रिकेट संघातील खेळाडू या ठिकाणी होते. ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.

ख्राइस्टचर्चमध्ये असलेल्या लिनवूड आणि डीन अव्हेन्यू या दोन मशिदींत माथेफिरू हल्लेखोराने बेछूट गोळीबार केला. त्यात डीन अव्हेन्यू मशिदीत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लिनवूड मशिदीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी या घटनेचा 17 मिनिटांचा लाइव्ह व्हिडिओ तयार केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. पण नंतर तो सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला. दरम्यान दोन गाड्यांमध्ये बॉम्ब लावण्यात आले होते. ते पोलिसांनी निकामी केले आहेत. हल्ला करणा-यांपैकी एक ऑस्ट्रेलियाचा नागरिक असल्याचे वृत्त आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न या हल्ल्यानंतर बोलताना म्हणाल्या की, आमच्या देशात सर्वांना स्थान आहे. सर्व धर्माच्या लोकांना आम्ही थारा देतो, त्यामुळेच आम्हाला लक्ष्य करण्यात आले.

न्यूझीलंड पोलिसचे माइक बुश यांनी ख्राइस्टचर्चच्या मस्जिदमध्ये झालेल्या फायरिंगविषयी सांगितले की, चार लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आम्ही सध्या या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. धोका संपला असे अजूनही मानता येणार नाही. मात्र काही काळानंतर तीनच जण ताब्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले आहे. मात्र अद्याप याविषयीही संपूर्ण माहिती मला मिळालेली नाही.

बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बालने गोळीबाराची माहिती ट्विटरवरून दिली. त्यांनी सांगितले की, संघातील सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. गोळीबार झाला तेव्हाचा अनुभव सर्वांसाठी भीतीदायक आहे. चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे आम्ही सुरक्षित आहोत असेही ते म्हणाले.

न्यूझीलंड बांगलादेशची उद्या टेस्ट मॅच होणार होती. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही मॅच रद्द करण्यात आली आहे.