शिवसेनेचाही मोदींना टोला, ‘राफेलवरील राहुल यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या’

मुंबई. राजकारणात राफेल मुद्द्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेनेनंही राफेल करारावरुन मोदींवर निशाणा साधलाय. शिवसेनेचे मुखपत्र सामानामध्ये राफेल मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. राफेल कराराविषयी राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावी असं शिवसेनेनं म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदींवर शरसंधान साधलं. राफेल करार वायुदलाच्या बळकटीकरणासाठी झाला की गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी झाला? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांकडून अपेक्षित आहे असे शिवसेनेनं म्हटलंय. याशिवाय साडेचार वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता असताना महागाई आणि भ्रष्टाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरणं हे स्वतःचं अपयश झाकण्यासारखं असल्याचंही ते म्हणाले.