औरंगाबादेत युतीचा कार्यकर्ता मेळावा, मुख्यमंत्री म्हणाले- ‘खोतकर-दानवे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे!’

4

एएम न्यूज नेटवर्क । शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर राज्यभरात कार्यकर्ता मेळावे सुरू आहेत. मेळाव्यांच्या माध्यमातून राज्यभरात युतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. अमरावती व नागपूरच्या मेळाव्यानंतर आता औरंगाबादेत मेळावा झाला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, पंकजा मुंडे, हरिभाऊ बागडे, चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांच्यासह राज्यभरातील नेतेमंडळी उपस्थित होती.

अर्जुन खोतकर…

> गेले तासभर मा. फडवणीस व उद्धवजींनी आम्हा दोघांनी युतीचा धर्म शिकवला. काय बोलावं हेच कळत नाही. मागचा तासभर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी आणि दानवे साहेब बसलो होतो.
> यानंतर पहिली परीक्षा माझी आहे, यात मी दोन्ही नेत्यांना शब्द देतो की, मी यात पास होईन. नंतरची परीक्षा मात्र रावसाहेब तुमची आहे. यात तुम्ही पास व्हावं.
> मधल्या काळात जालन्यात आणीबाणी लागली होती, मात्र आज ती उठली आहे.
> मी कधीच पक्षनिर्णयाच्या विरोधात गेलो नाही. दगाफटका आमच्या स्वभावात नाही; पण आम्हालाही सोबत राहू द्या दानवे साहेब.
> शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी पार पाडू. आजपासून युतीच्या कामाला लागणार. तुम्हाला रान मोकळो करतो, असे म्हणत अखेर खोतकर यांनी माघार घेतली आहे.

रावसाहेब दानवे…

> भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर राज्यभरात वातावरण निर्मिती करण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
> हा निवडणुकीचा सामना एनडीएविरुद्ध यूपीएचा आहे. यूपीएचे पक्ष अजूनही एकत्र आलेले नाहीत.
> मधल्या काळात पक्ष म्हणून आपल्या काही कुरबुरी झाल्या, पण शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये कोणतीही कुरबुर नव्हती.
> सामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारने सर्वतोपरी काम केलं.
> गेली चार-साडेचार वर्षे काय झाले ते सर्व विसरून जा. दोन्ही पक्षांनी आपलं काम वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
> काही गोष्टी घडल्या, आमचे मित्र खोतकरांनी याचा उल्लेखही केला. पक्ष म्हणून आमचे काही मतभेद होते पण आता अर्जुनरावांनी युद्ध संपल्याचं जाहीर केलंय.
> अर्जुनरावांना मी खात्री देतो, अर्जुनराव मीही तुम्हाला धोका देणार नाही. आताची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, ती तुम्ही निश्चित पास व्हाल. पण पुढच्या परीक्षेत मीही तुम्हाला 100 टक्के गुण मिळवून दाखवीन, असं म्हणत दानवेंनी भाषणाचा समारोप केला.

देवेंद्र फडणवीस…

> मगाशी अर्जुनराव खोतकर म्हणाले की, श्रीकृष्ण त्याला धर्म सांगत नाही, तोपर्यंत अर्जुन कामाला लागत नाही. खरोखरंच आज याचीच पुनरावृत्ती झाली.
> ज्याप्रमाणे शिवसेना- भाजप फेव्हिकॉल का मजबूत जोड आहे, त्याप्रमाणेच खोतकर-दानवे मजबूत जोड होणार आहे.
आपण वेगळे झालो, पण मनाने कधीच वेगळे झालो नाहीत. इतरांची युती होते, पण घट्ट होत नाही. ते कोणीही सोबत राहू शकत नाहीत.
> आमच्यातला हिंदुत्वाचा समान धागा आहे. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, तर ते सर्वसमावेशक आहे.
> मनाने आम्ही कधीही वेगळे नव्हतो, परिस्थितीने झालो होतो. परंतु आज पुन्हा एकत्र आलो आहोत.
> मराठवाड्यातील आठही जागा शिवसेना-भाजप युतीच्याच येतील.
> अर्जुनाला जसा एकच माशाचा डोळा दिसत होता, तसा कार्यकर्त्याला फक्त युतीचा विजयच दिसला पाहिजे.
गरिबांची स्वप्ने मोदी सरकारने पूर्ण केली.
>आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये, यानंतरच्या प्रत्येक मेळाव्यात आपल्याला सोबत यायचं आहे. आपल्याला एकत्र येऊनच स्वप्न साकार करायचं आहे.

उद्धव ठाकरे…

> सर्व जुने वाद मिटले आहेत. सगळ्यांना प्रश्न होता की, अर्जुन आणि दानवे काय करणार?
> रावसाहेब अर्जुनाने बाण खाली ठेवलेला नाही, त्याला फक्त एक दिशा दिली आहे.
> जे झालं ते झालं, पण आता यापुढे ते उगाळायचं नाही. आपण इथं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी आलो आहोत.
> ही युती टवटवीत ठेवणं आपली जबाबदारी आहे. संभाजीनगरात आल्यावर इथले मूलभूत प्रश्न उदा. समांतर जलवाहिनी, कचऱ्याचा प्रश्न यासाठी संभाजीनगरकरांना वचन देण्याची गरज आहे.> हा आपला बालेकिल्ला आहे. येथील नागरिक हे शिवसैनिक आहेत. त्यांना नाराज करून चालणार नाही, ते नाराज होणारही नाहीत.
> महाराष्ट्रातल्या 48च्या 48 जागांवर भगवाच फडकणार आहे. शिवसेना ही गोरगरिबांसाठी लढणारी संघटना आहे. रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे एक प्रतीक ठरावेत. एकमेकांतील दुरावा घालवून हे दोघेही एकत्र आलेत. आता जुन्या गोष्टी उगाळायच्या नाहीत. आता युतीसाठीच कष्ट उपसायचे.