शरद पवारांचे मोदींना आव्हान, म्हणाले – कुलभुषण यांना सोडून आणा आणि 56 इंचाची छाती दाखवा

बीड | लोकसभा निवडणुकांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. कुलभूषण जाधव अडीच वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे, त्यांची सुटका करा आणि मगच तुमची 56 इंचाची छाती दाखवा असे आव्हान पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. बीडमध्ये प्रचारसभेदरम्यान पवार बोलत होते.

तेव्हा 56 इंचाची छाती तपासली का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात होणाऱ्या सभांमध्ये शरद पवारांवर टीकास्त्र सोडले होते. यानंतर शरद पवारही त्यांच्यावर पलटवार करत आहेत. आता पवार म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात चाळीस जवान शहीद होतात. जवानांचे रक्त वाया जावू देऊ नका असे म्हणत मोदी मतं मागत आहेत. जवानांच्या रक्ताचा बदला घेतला, आनंद झाला. अभिनंदन केले. नंतर अभिनंदन वर्धमान हा आपला भारतीय जवान पाकिस्तानच्या हद्दीत सापडला. यानंतर त्याला पाकिस्तानातून सोडवून आणण्यात आले. मात्र जिनेव्हा करारानुसार त्याला पाकिस्तानला सोडावे लागले. मात्र हे नरेंद्र मोदी म्हणतात की, मी अभिनंदनला सोडवून आणले. असे असेल तर कुलभूषण जाधव अडीच वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे, त्यांची सुटका करा आणि मगच 56 इंचाची छाती दाखवा. असे म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला.

गोपीनाथ मुंडेंचा खरा वारस धनंजय मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत पवार कुटुंबीयांवर टीका केली होती. शरद पवारांनी त्याच पार्श्वभूमीवर त्यांना उत्तर दिले. पवार म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडे अत्यंत प्रभावीपणे पुढे नेत आहेत. यामुळे नरेंद्र मोदींनी माझ्या घराची चिंता करू नये. ते एकटे आहेत, मात्र माझे घर भरलेले आहे असा टोला त्यांनी मोदींना लगावला. तसेच मोदीजी हे वागणं बरं नव्ह…! म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली.