माझ्या पुतण्याने माझ्या घराचा कारभार हाती घेतला तरी मला चिंता नाही : शरद पवार

जालना | लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे शाब्दीक युद्ध चांगलेच रंगात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत शरद पवारांच्या कुटुंबावर टीका केली होती. यानंतर आता शरद पवारांनी त्यांना पुन्हा एकदा उत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले की, माझ्या घरचा सर्व कारभार माझ्या पुतण्याने घेतला तरीही मला चिंता नाही, मला एक मुलगी आहे आणि तिचेही लग्न झाले आहे. स्वतःच्या घरात तर कुणी नाही मग माझ्या घरात का डोकावून पाहता. मोदीजी हे वागणं बरं नव्हे म्हणत शरद पवारांनी मोदींना टोला लगावला.

तुम्ही कशाला चिंता करता

शरद पवार पुढे म्हणाले की, माझ्या घरात ताळमेळ नाही अशी टीका पंतप्रधान माझ्यावर करतात. माझ्या घराची तुम्ही कशाला चिंता करता. माझ्या घरात मोठं खटल आहे. तुमच्या घरात काहीच नाही. माझ्या घरात डोकावून पाहू नका. हे वागणं बरं नाही. असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी पंतप्रधानांना मारला. आज परभणी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ पवारांची जालन्यातील परतूरमध्ये प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीकेची झोड उठवली.

मोदींवर सडकून टीका

मी राजकारणात शरद पवार यांच बोट धरून आलो या पंतप्रधानांच्या वक्तव्याचा देखील पवार यांनी कसून समाचार घेतला. पंतप्रधानांनी हे वाक्य बोलल्याच्या दिवसापासून माझी झोप उडाली आहे. त्यांनी माझा धरला तर काय होईल माहिती नाही असा टोलाही पवारांनी मारला.

बिनपैशाची प्रसिध्दी मला मिळते

या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आस्था नाही, पंतप्रधान जिथे जातात तिथे माझ्यावर टीका करतात. जसे संताजी धनाजी एकेकाळी त्यांच्या विरोधकांना दिसायचे तसाच आजच्या राज्यकर्त्यांना महाराष्ट्रात फक्त मी दिसतो. मोदीजी तर जिथे जातील तिथे माझ्यावर टीका करतात. पण हरकत नाही, यामुळे बिनपैशाची मला प्रसिद्धी मिळते असा चिमटा घ्यायला पवार विसरले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी वर्धा येथे प्रचार सभा होती. यावेळी मोदींनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले होते. ‘राष्ट्रवादीत कौटुंबिक कलह सुरू आहे. पक्ष त्यांच्या हातातून निसटत आहे. पुतणे अजित पवार पक्षाचा ताबा घेत आहेत. यामुळेच राष्ट्रवादीला तिकीट वाटपात अडचणी येत आहे.’ असे मोदी म्हणाले होते. याचेच उत्तर शरद पवार यांनी पुन्हा एकदा दिले आहे.