सीबीआयचे माजी प्रभारी संचालक नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, कोपऱ्यात उभे राहण्याची शिक्षा

नवी दिल्ली | बिहार शेल्टर होम प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयचे तत्कालिन अंतरिम संचालक नागेश्वर राव यांना फटकारले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, तपास अधिकाऱ्यांना एक दिवसानंतर हटवल्याने असे काय आभाळ कोसळले असते? एकिकडे प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगतात आणि दुसरीकडे रिलिव्हींग ऑर्डरवर सही करतात. यासाठी नागेश्वर राव या यांना कोर्टाच्या अवमान प्रकरणी दोषी असल्याचे गोगोई म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने नागेश्वर राव यांना कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना 1 लाखांचा दंडही ठोठावला आहे. सुप्रीम कोर्टाने मनाई केल्यानंतरही नागेश्वर राव यांनी बिहार शेल्टर होम प्रकरणी तपास अधिकारी शर्मा यांची बदली केली होती. याप्रकरणी सुनावणीत सरन्यायाधीश म्हणाले की, राव यांना सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहे हे माहिती असूनही त्यांनी असे केले. राव यांच्याकडे शर्मा यांच्या बदलीचे कागद आले आणि त्यांनी जराही विचार न करता सही केली. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी काय प्रतिज्ञापत्र सादर केले आहे हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे समजले नाही, असे गोगोई म्हणाले. याचा काय परिणाम होईल याची जाणीव राव यांना हवी होती, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

नागेश्वर राव यांनी मागितली माफी

नागेश्वर राव यांनी या प्रकरणी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून बिनशर्त माफी मागितली आहे. राव यांच्या 30 वर्षांच्या स्वच्छ कारकिर्दीचा विचार करून निर्णय द्यावा अशी विनंती अॅटर्नी जनरल यांनी राव यांची बाजू मांडताना केली.