शिवसेना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले- ‘भाड में गयी आचारसंहिता, भाड में गया कानून’

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. आचारसंहितेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे त्यांनाच चांगले भोवणार आहे. खासदार संजय राऊत रविवारी प्रताप फाउंडेशन कार्यक्रमासाठी मीरा भाईंदर येथे आले होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले. ते बोलताना म्हणाले की, ‘भाड में गयी आचारसंहिता, भाड में गया कानून’. संजय राऊत नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. मात्र निवडणुकीच्या काळात आचारसंहितेविषयी असे विधान केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

संजय राऊत म्हणाले की, निवडणुकांचे वातावरण आहे, मला वारंवार आठवण करुन दिली जात आहे की, आचार संहिता आहे. माझ्या मनात आचारसंहितेची नेहमी भीती असते. एकतर आम्ही कायदा मानणाऱ्यातले नाही. यात आम्हाला पुन्हा पुन्हा आचारसंहिता आणि कायद्याची आठवण करुन दिली जाते. आम्ही असे लोक आहोत, ‘भाड में गयी आचारसंहिता, भाड में गया कानून’ आचारसंहितेचे आम्ही पाहून घेऊ. जी गोष्ट आमच्या मनात आहे, ती गोष्ट मनातून बाहेर पडली नाही तर गुदमरल्या सारखे होते. काही बोलण्यासाठी आम्ही कायद्याला घाबरत नाही असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, कायदा आहे आचारसंहिता आहे हे ठीक आहे. पण आम्ही कायद्यासाठी बनलो नाही, कायदाही आमच्यासाठी बनलेला नाही. यामुळे ते आता वादावच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जाईल. प्रताप फाउंडेशनच्या वतीने राम नवमीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्तर भारतीय जनसमुदायाला संबोधित करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांना आचारसंहितेविषयी वादग्रस्त विधान केले.