ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उस्मानाबाद | शिवसेना उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर उमरगा पोलीस ठाण्यात खासदार रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मतदान दोन दिवसांवर आले असताना शिवसेनेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एका व्हिडीओ क्लिपमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बद्दल शिवराळ भाषा वापरली. या पार्श्वभूमीवर खासदार रवींद्र गायकवाड यांनी आपली बदनामी झाल्याची तक्रार उमरगा पोलीस ठाण्यात दिली होती. यानुसार माहिती तंत्रज्ञान प्रसारण कायदा 2000 मधील कलमान्वये ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे

विद्यमान खासदार रवी गायकवाड, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना शिवीगाळ केल्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्याविरुद्ध रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून कलम 65,66(1),67 व भादंवि कलम 500,501,502,503 नुसार उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रवींद्र गायकवाडांना पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी ओमराजेंनी प्रयत्न केले होते. मातोश्रीवर कार्यकर्त्यांसह जाऊन त्यांनी गायकवाडांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. उस्मानाबादेत शिवसेनेचा अंतर्गत कलह यानमित्ताने चव्हाट्यावर आला होता. या निवडणुकीच्या काळात ओमराजेंची ती क्लिप व्हायरल झाली आणि विद्यमान खासदार गायकवाडांनी पोलीस तक्रार केली. या घटनेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.