तेलंगणा, राजस्‍थानमध्‍ये मतदानाला सुरूवात; अनेक ठिकाणी EVM मध्ये बिघाड

जालोर जिल्‍ह्यातील अहोर येथे ईव्‍हीएम बिघाडामुळे मतदारांनी संताप व्‍यक्‍त केला.

जयपूर/हैदराबाद |

राजस्थान आणि तेलंगणा विधानसभेसाठी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. राजस्थान विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी मतदान होत आहे. अलवर जिल्‍ह्यातील रामगड मतदारसंघाचे बसपाचे उमेदवार लक्ष्‍मण सिंह यांचे निधन झाल्‍यामुळे येथील निवडणूक तुर्तास रद्द करण्‍यात आली आहे. राजस्‍थानमध्‍ये सकाळी 11 वाजेपर्यंत 21.89% मतदान झाले. तर तेलंगणाच्या 119 जागांवरही मतदान सुरू आहे. येथे सकाळी 9 वाजेपर्यंत 8.97% मतदानाची नोंद झाली.

राजस्‍थानमध्‍ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. तर तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान आहे. या दोन्‍ही विधानसभा निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबरला लागणार आहे. तर मध्‍यप्रदेश, छत्‍तीसगड आणि मिझोरम या विधानसभा निवडणुकांचे निकालही याच दिवशी जाहीर होणार आहेत.

अनेक ठिकाणी ईव्‍हीएममध्‍ये बिघाड
राजस्‍थानच्‍या चित्तोडगड, बेंगू, सवाई मधोपूरमध्ये ईव्‍हीएममध्‍ये बिघाड झाल्‍याने मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. याठिकाणी उशीरा मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. तर अहोर मतदारसंघातील बुथ नं. 253 आणि 254 येथे ईव्‍हीएममधील बिघाडामुळे 11 वाजेपर्यंत मतदानास सुरूवात झाली नाही. यामुळे रांगेत उभे असलेल्‍या मतदारांनी संताप व्‍यक्‍त केला आहे.

ईव्‍हीएम बिघाडाचा फटका मंत्री व अधिका-यांनाही बसत असल्‍याचे दिसून येत आहे. जयपूरमधील एका बुथवर राजस्‍थानचे मुख्‍य सचिव डी.बी.गुप्‍ता यांना मतदानासाठी 20 मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. तर बिकानेरमध्‍ये केंद्रीय राज्‍यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना ईव्‍हीएम बिघाडामुळे मतदान न करताच परतावे लागले.