महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी गुढी, वंचित महिलांनी गुढी उभारून समाजाला दिला सामाजिक संदेश

रायगड | देशातील दीडशेपेक्षा जास्त ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “महिला उठती नही तो समाज बदलेगा नही” हे राष्ट्रीय अभियान सुरू आहे. या अभियानामध्ये पेण येथील महिला अत्याचार विरोधी मंचाने सहभागी होऊन आज गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील एक आगळीवेगळी गुढी उभारून “ही गुढी आमच्या अस्मितेची” हा संदेश दिला.

ही गुढी उभारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील आणि मोहिनी गोरे यांनी पुढाकार घेतला. समाजातील ज्यांना पेन्शन नाकारली जाते त्या विधवा महिला, समाजातील वंचित महिला, मतिमंद, अनाथ, एकल, अत्याचार पीडित आणि ज्यांना ज्यांना महिला अत्याचार मंचाने मदत केली व मार्गदर्शन केले त्या सर्व महिलांना एकत्र आणून महिलांमध्ये परिवर्तन करण्याची, राजकीय परिवर्तन करण्याची आणि स्वकर्तृत्वाने स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची ताकद या महिलांमध्ये आहे हे समाजाला दाखवून दिले. महिला अत्याचार विरोधी मंचाने महिला शेतमजुरांसाठी व कष्टकरी महिलांसाठी पेन्शनची रक्कम 600 ते 800 रुपये आहे. ती सहा हजार करावी यासाठी “मी पण” नावाचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो आवाज बुलंद करण्यासाठी देखील आज ही गुढी महिला अत्याचार विरोधी मंच आणि अंकुर ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आली. यावेळी पेण शहरातून आजच्या नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रॅली काढून मुलगी वाचवा, समाज वाचवा, मुलगी हीच देशाची संपत्ती, आजच्या पिढीची गुढी समानतेची असे विविध प्रकारचे संदेश देऊन आणि मराठी अस्मिता जपणाऱ्या फुगड्या खेळून ही गुढी उभारण्यात आली.