10 दिवसांपू्र्वी अनिल अंबानींना कराराविषयी कसे माहीत झाले ? राहूल गांधी यांचा राफेलवर प्रश्न

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेल मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मंगळवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी एका ईमेलचा उल्लेख करत राफेल कराराविषयी प्रश्न उपस्थित केले. एअरबस कंपनीच्या एक्झिक्युटीव्हने या इमेल मध्ये लिहिले होते की, अनिल अंबानी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांच्या ऑफीसमध्ये गेले होते. दरम्यान पंतप्रधान आल्यानंतर अनिल अंबानींचे नाव असलेल्या एका एमओयूवर स्वाक्षरी होणार असल्याचे ते म्हणाले होते. याबाबतची माहिती भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री, एचएएल तसेच परराष्ट्र मंत्री यांपैकी कोणालाही नव्हती. पण अनिल अंबानींना 10 दिवस अगोदरच या करारविषयी माहीत होते. म्हणजेच पंतप्रधान हे अनिल अंबानींचे मध्यस्थी म्हणून काम करत होते.

देशाविषयीच्या खासगी गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर केल्यामुळे पंतप्रधानांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच हा देशद्रोहाचा गुन्हा असून त्यांना तुरुंगात पाठविण्यात यावे असे राहुल यावेळी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सदर प्रकरण प्रक्रिया, भ्रष्टाचार आणि देशद्रोह या तीन प्रकाराशी संबंधीत जुडलेले आहे. या प्रकरणातून सुटका होणार नाही.

आधी ट्विटर मग पत्रकार परिषदेतून पंतप्रधानांवर साधला निशाणा

राहूल गांधींनी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यापू्र्वी एक ट्विट केले होते. ‘प्रिय विद्यार्थी मित्र आणि देशातील युवकांनो, दररोज राफेलसंबंधी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, पंतप्रधानांनी अनिल अंबानींना तुमचे 30 हजार कोटी रूपये चोरी करण्यासाठी मदत केली आहे.’ या ट्विट नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

यापूर्वी राहूल गांधी यांनी सोमवारी लखनऊमध्ये रोड शो केला होता. ‘देशाच्या चौकीदाराने उत्तर प्रदेश, इतर राज्य आणि एअरफोर्समधून पैशांची चोरी केली आहे. चौकीदार हा चोर आहे. उत्तर प्रदेश हे देशाने हृदय आहे. आम्ही आता फ्रन्टफूटवर खेळणार आहोत. जोपर्यंत काँग्रेसची विचारसरणीचे सरकरा राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत सिंधीयाजी, प्रियंकाजी आणि मी थांबणार नाहीत.’ अशाप्रकारचे व्यक्तव्य त्यांनी या रोड शो दरम्यान केले होते.