सिंधूसोबत चीनच्या स्पोर्ट ब्रँड कंपनीचा करार, 4 वर्षांत मिळणार 50 कोटी

हैदराबाद: ऑलिम्पिक आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या एका कंपनीशी करार केला आहे. चीनच्या क्रीडा क्षेत्रातील आघाडीवर असलेली स्पोर्ट ब्रँड कंपनी ली निंग बरोबर हा करार करण्यात आलाय. 4 वर्षांच्या या करारानुसार तिला 40 कोटी रुपये तिला दिले जाणार आहे. तर 10 कोटी रुपये क्रिडा साहित्यावर खर्च केले जाणार आहेत. जागतिक बॅडमिंटन क्षेत्रामध्ये सिंधूचा हा सर्वात मोठा करार म्हणावा लागेल. ली निंग कंपनीची भागीदार कंपनी सनलाइट स्पोर्ट्सचे संचालक महेंद्र कपूर यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

पी. व्ही सिंधू ही भारताची आघाडीची खेळाडू आहे. पण असा करार करणारी ती भारताची पहिली खेळाडू नाही. यापुर्वी भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत यानेही चीनच्या या कंपनीसोबत करार केला होता. या करारानुसार त्याला लि निंग कंपनीने 35 कोटींचा करार केला होता. आता लि निंग कंपनीने सिंधूसोबत 50 कोटींचा करार केलाय. सिंधूचाही हा पहिला करार नाही. ऑलिम्पिकनंतर सिंधूने क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या बेसलाइन व्हेंचर कंपनीशी 100 कोटींचा करार केला होता.

सनलाईट स्पोर्ट्स लिमिटेडचे संचालक महेंद्र कपूर यांनी स्पष्ट केले की, ली निंग कंपनीला सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांच्याकडून दीर्घकालीन सहकार्याची अपेक्षा आहे. सिंधूनेही या कराराबाबत समाधान व्यक्त केले आहे. तर कंपनीला पी. व्ही सिंधूकडून खुप अपेक्षा आहेत. कंपनीकडून सिंधूला प्रशिक्षणासाठीही सहकार्य केले जाणार आहे. सिंधूने यापुढेही उत्तम कामगिरी करावी आणि सुवर्ण पदक पटकावावे अशी कंपनीची अपेक्षा आहे.