डॉ. तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर, न्यायालयाचे सुटकेचे आदेश

पुणे | डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर ठरवत पुण्यातील विशेष सत्र न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून तेलतुंबडे यांना आज सकाळी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुणे येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तेलतुंबडे यांचे वकील अॅड. रोहन नहार यांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला. तेलतुंबडे यांना 11 फेब्रुवारीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले असतानाही अटक कशी करण्यात आली? असा सवाल नहार यांनी केला. त्यानंतर विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचे नमूद केले व तेलतुंबडे यांच्या सुटकेचे आदेश दिले.