वाशिममध्ये मंदिरात पुजाऱ्याची निर्घृण हत्या

वाशिम | मंगरूळपिर तालुक्यातील ग्राम कोठारी येथे मुंगसाजी महाराज मंदिरातील पुजारी किसनगिरी शिवगीरी महाराज (वय 105) यांची सोमवारी मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली. आज सकाळी मंदिराच्या सेवकाला रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. किसनगिरी महाराज हे मागील 30 वर्षांपासून कोठारी येथे वास्तव्यास होते. ते गावोगावी जाऊन सामान्यांना मार्गदर्शन करायचे. मुंगसाजी महाराज भक्तांनी गावातच त्यांना ध्यानमंदिर बांधून दिले होते. आज (मंगळवारी) सकाळी भाऊराव मारोती डहाके हे मंदिरसफाईकरीता गेले असता त्यांना महाराजांचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात आढळले. यानंतर गावकऱ्यांनी ताबडतोब घटनेची माहिती पोलिसांनी दिली. हत्येच्या कारणाचा मंगरूळ पोलिस तपास करत आहेत.