प्रियंका गांधींनी घेतली भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांची भेट, म्हणाल्या-तरुणांचा आवाज दाबला जातोय

1

नवी दिल्ली | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी बुधवारी भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली. मेरठच्या एका हॉस्पिटलमध्ये चंद्रशेखर यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्या ठिकाणी प्रियंका यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रियंका गांधींबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे आता हार्दिक पटेल पाठोपाठ चंद्रशेखरही काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. चंद्रशेखर यांनी मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार, असे जाहीर केले आहे.

चंद्रशेखर यांना भेटायला गेलेल्या प्रियंका गांधी यांनी जवळपास अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनंतर बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, हे अहंकारी सरकार आहे. त्यांना तरुणांचा आवाज दाबायचा आहे. तरुणांना सरकारने रोजगार तर दिलाच नाही, पण त्यांना संघर्षही करू देत नसल्याचे त्या म्हणाल्या. या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आझाद या भेटीनंतर बोलताना म्हणाले की, माझी बहीण मला भेटण्यासाठी आली होती. त्यांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली. मी बहुजन समाजात जन्माला आलो आहे आणि बहुजन समाजातच माझा शेवट होईल. पंतप्रधान ज्या ठिकाणाहून निवडणूक लढवतील तेथूनच मीही निवडणूक लढवणार आहे. मोदींना पराभूत करून त्यांना गुजरातला परत पाठवणार असल्याचे ते म्हणाले.

भीम आर्मीचे प्रमुख असलेल्या चंद्रशेखर यांना पोलिसांनी मंगळवारी देवबंदमध्ये अटक केली होती. त्यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. नंतर त्यांची प्रकृती खराब झाल्याने मेरठला उपचारासाठी पाठवण्यात आले.