‘देशात 2 पंतप्रधानांच्या मुद्द्यावर पवार गप्प का?’, नगरच्या सभेतून पंतप्रधान मोदींचे शरद पवारांवर शरसंधाण

अहमदनगर । भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची आज नगरमध्ये सभा होत आहे. या सभेच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नगरच्या निरंकारी भवनामागील मैदानावर मोदींची भव्य सभा होत आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राम शिंदेंसह जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले पण सातच दिवसांत बारावा खेळाडू म्हणून परतले.
– खासदार गांधींनीही चांगलं काम केलं, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्याही पाठीशी उभं आहोत.
– डॉ. सुजय विखेंच्या निमित्तानं आम्ही काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राइक केला आहे.
– गेल्या 4 वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वात केंद्राने राज्याला एवढी मदत केली की, येणाऱ्या काळात हा भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.
– नदीजोड प्रकल्पातून हा भाग सुजलाम सुफलाम करणार.
– शेतकऱ्यांना 2384 कोटी रुपयांची मदत केली.
– सुपा- पारनेरमध्ये मोठी इंडस्ट्रियल उघडून मोठमोठे उद्योग आणले. यातून तरुणाईला रोजगार उपलब्ध केला आहे.

नरेंद्र मोदी

– पंतप्रधानांनी राम नवमीच्या सर्वांना मराठीतून शुभेच्छा दिल्या.
– मोदी म्हणाले- 5 वर्षांपूर्वी मी याच तारखेला येथे आलो होतो, तेव्हा याच्या अर्धीसुद्धा गर्दी नव्हती. आणि आता तुम्ही उन्हातान्हात येऊन माझ्यावर मोठे ऋण केले आहे.
– मागच्या 5 वर्षांत जनभागीदारीने चालणारी एक मजबूत सरकार जगाने भारतात पाहिली.
– त्यापूर्वीची रिमोट सरकारची दहा वर्षे कशी होते आठवते ना? तेव्हा दररोज घोटोळ, गफले, निर्णय न घेणे अशा बातम्या यायच्या.
– दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्यासाठी चौकीदाराचं हे सरकार प्रतिबद्ध आहे. भारताने जगासमोर गाऱ्हाणं मांडणं बंद केलं आहे. तुम्ही या मजबूत भारतामुळे खुश आहात का? तुम्ही खुश आहात, पण ज्यांनी अनेक वर्षांपासून देशाच्या भावना समजून घेणेच सोडून दिले आहे.
– काँग्रेस- राष्ट्रवादी अशा लोकांसोबत आहेत, ज्यांना जम्मू-काश्मीर वेगळा हवा आहे, तेथे वेगळा पंतप्रधान हवा आहे.
– काँग्रेसचं जाऊ द्या, पण शरदरावांना काय झालं? शरदराव देशात दोन पंतप्रधान असणं तुम्हाला मंजूर आहे का? किती दिवस यावर गप्प राहाल? तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं ते जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायला का? छत्रपती शिवाजींच्या भूमीतले असूनही तुम्हाला झोप कशी येतीये?
– काँग्रेस म्हणतंय की, जम्मू-काश्मिरातून सैन्य हटवू, सैन्याचा विशेषाधिकार काढून घेऊ.
– भटक्या-विमुक्त समाजाला सरकारी मदत योग्य रीतीने मिळावी म्हणून आयोग बनवण्याचा निर्णयही तुमच्या मतामुळे होत आहे.
– आज स्वयंरोजगारासाठी कोट्यवधी तरुणांना विनातारण कर्ज मिळत आहे.
– फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा रुजवण्यासाठी तसं हृदय असावं लागतं, जे घराणेशाही जोपासणाऱ्या पक्षांमध्ये नाही.
– 23 मे नंतर जेव्हा पुन्हा मोदी सरकार येईल तेव्हा सर्व शेतकऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळेल.
– दिवसरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर नियमित पेन्शन मिळायला लागेल.
– उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भावाचा संकल्प आम्ही पूर्ण केला. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. ऊसाची शेती करणाऱ्यांसाठी उसापासून इथेनॉल तयार करण्याचे प्लांट देशभरात उभारले जात आहेत.
– अहिल्यादेवी होळकरांनी ज्याप्रमाणे गावागावात विहिरी, बारवा उभारल्या, त्याचप्रमाणे हे सरकार फक्त पाण्यासाठी वेगळे मंत्रालय उभारले जाईल.
– एकीकडे आमचे संकल्प आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे फसवे जाहीरनामे आहेत.
– जनतेने काँग्रेसच्या नियतला चांगलेच ओळखले आहेत.
– ‘काँग्रेस हटाओ’ हा नवा नारा जनतेने दिला आहे.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील हेदेखील आता आपला मुलगा सुजय विखे-पाटील यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु ते भाजप प्रवेश करणार नसून काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांचे पुत्र सुजय विखेंनी एएनआयला दिले. परंतु, विरोधी पक्षनेता भाजपमध्ये गेला असता तर महाराष्ट्र काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का ठरला असता.