आता आम्ही न्यू संग्राम उभा केला आहे, पंकजा मुंडेंचा शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटेंवर निशाणा

बीड | लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर बीडमधील राजकारण तापताना दिसत आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंयजय मुंडेंचा वाद तर आहेच. यासोबतच भाजप महायुती घटक पक्षातील शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी प्रीतम मुंडेंना पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट केले होते. आता पंकजा मुंडे यांनी आपल्या सभेत भाषण करताना मेटेंवर निशाणा साधला आहे. अख्खे शिवसंग्राम आमच्या बरोबर आलंय आता आम्ही न्यु संग्राम उभं केलं आहे असा टोला त्यांनी मेटेंना लगावला.

पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की, सर्व जण आमच्यासोबत आहेत, इकडे मोहन जगताप आले. तिकडे सुरेश धस आले, अख्ख शिवसंग्राम आमच्या बरोबर आलं आहे. आता आम्ही न्यू संग्राम उभं केलंय. आमचं हे न्यू संग्राम कोणत्याही जातीचे नाही. हे न्यू संग्राम मातीचे राजकारण करणारे आहे. राज्यात भाजपसोबत मात्र बीडमध्ये राष्ट्रवादीसोबत राहू असे म्हणणाऱ्या आमदार विनायक मेंटेचा पंकजा मुंडेंनी समाचार घेतला. बीड लोकसभेच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बीडच्या चौसाळ्यात बोलत होत्या.

यापूर्वीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्या भूमिकेवर टीका केली होती. राज्यात भाजप म्हणजे गोपीनाथ मुंडे, मुंडे यांच्यासोबत जे होते त्यांना आम्ही आमच्यासोबत कायम ठेवले, मात्र बीडमध्ये भाजप विरोधात अन् राज्यात सोबत हे चालणार नाही, यायचे तर सोबत या नसता गरज नाही, जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ पण विजय नक्की मिळवू असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटेंना टोला लगावला होता.

विनायक मेटे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष सर्वपरिचित आहे. त्यामुळे मेटे यांनी लोकसभेचा बिगुल वाजताच पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडत आपण राज्यात भाजपसोबत राहू मात्र बीडमध्ये नाही, हे जाहीर केले होते. विनायक मेटेंनी बीडमध्ये भाजपविरोधी उघड भूमिका घेतली होती. यानंतर विनायक मेटेंनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना आपला पाठींबा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंना अल्टीमेटम दिला होता. तर आता पंकजा मुंडे यांनीही त्यांना चांगलाच टोला लगावला आहे.