पालघर-सिंदखेडराजा येथे अपघात, पाच जण ठार, मृतांमध्ये गर्भवती महिलेचाही समावेश

मुंबई | दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाल्याचे वृत्त आहे. मोटारसायकलच्या भीषण अपघातात पाच लोकांना आपले प्राण गमवावे लागले. दुर्दैवी बाब म्हणजे या मृतांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. पालघर येथील मनोर रोडवर शेलवाली येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर सिंदखेडराजा येथे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले.

पालघर येथी अपघातात एक ठार 

पालघर येथील मनोर रोडवर शेलवाली येथे एका मोटरसायकल स्वाराचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्याचा जागेवर जीव गेला. भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

दोन मोटारसायकलच्या धडकेत चार ठार, गर्भवती महिलेचाही समावेश

सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी सेवली रोडवर पांगरी फाट्याजवळ दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एका गर्भवती महिलेचा ही समावेश आहे. गर्भवती महिलेचा एक वर्षापूर्वी चिंचखेड येथील युवकाशी विवाह झाला होता. बाळंतपण व लग्नसमारंभासाठी हे दाम्पत्य चिंचखेडहुन सासरवाडी चांगेफळ या ठिकाणी येत होते. याचदरम्यान दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला. यात तीन लोक जागेवरच ठार झाले. एकाचा रुग्णालयात जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला.