विरोधकांनी पुन्हा उचलून धरला ईव्हीएमचा मुद्दा, आता सुप्रीम कोर्टात जाणार

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांच्या काळात ईव्हीएम मशीनचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर काँग्रेससोबतच अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनसोबत लावण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट मशीनच्या रिअॅक्शन टाइम आणि त्यामधून निघणाऱ्या पावतीवर आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे व्हीव्हीपॅटमधून चुकीच्या नावाच्या पावत्या बाहेर येत आहेत. हा मुद्दा सुप्रीम कोर्टात मांडणार असल्याचे विरोधी पक्षांनी सांगितले आहे.

सेव्ह डेमोक्रेसी या नावाने रविवारी विरोधी पक्षांनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मनु सिंघवी, कपिल सिब्बल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस नेता आणि वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ईव्हीएममध्ये मत देण्यासाठी बटन दाबल्यानंतर त्याच्यासोबत लावण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधून निघत असलेली पावती फक्त 3 सेकंदांसाठी दिसते. हा काळ खूप कमी आहे. हा वेळ वाढवून 7 सेकंद करावा.

मतदारांनी ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच्याऐवजी व्हीव्हीपॅट मशीनमधून निघालेल्या पावतीमध्ये दूसऱ्याच उमेदवाराचे नाव आहे. अशा काही तक्रारी समोर आल्याचे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. म्हणजेच ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप लावला आहे. केजरीवाल म्हणाले, ‘मशीन खराब नाहीत, त्याच्यामध्ये घोटाळा करण्यात आला आहे. कोणत्याही पक्षाला मत दिल्यानंतर ते भाजपलाच जावे अशी या मशीनची डिझाइन करण्यात आली आहे.’ केजरीवाल म्हणाले की, ज्या मशीन खराब असल्याच्या तक्रारी येतात त्यामध्ये चुकून मत भाजपलाच का जाते? दुसऱ्या पक्षाला का जात नाही? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

केजरीवाल म्हणाले की, मी एक इंजीनियर आहे. मला या गोष्टी कळतात. काही तरी गडबड नक्कीच आहे. भाजपवाले स्वतःला मर्द म्हणतात आणि चोरीही करतात असा आरोप त्यांनी लावला आहे.

यासोबतच मतदान यादीतून मतदारांचे नाव गायब झाल्याचा मुद्दाही उचलून धरण्यात आला. टीडीपी चीफ आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आरोप लावला की, तेलंगानामध्ये तंत्रज्ञानाचा चुकीच्या पध्दतीने वापर करुन 25 लाख मतदारांचे नाव लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहेत.