कांदा उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा, व्यापाऱ्यालाच द्यावे लागले पैसे

दत्ता ताटे, कांदा उत्पादक शेतकरी

बीड | कांदा विक्रीतून दोन पैसे हातात येण्याऐवजी शेतकऱ्यांनाच व्यापाऱ्याला पैसे देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं सोडाच पण रोजचं तेलमीठ तरी कसं आणायच, या विंवचनेत हे शेतकरी सापडलेत. बीड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची ही प्रातिनिधीक कथा.

बीडमधील नांदूरघाट येथे दत्ता ताटे यांनी अर्ध्या एकरात कांद्याची लागवड केली. 7 हजार रुपये खर्चून त्यांनी 13 क्विंटल कांद्याचं उत्पादन घेतलं. हा कांदा त्यांनी विक्रीसाठी सोलापूरच्या अडत मार्केटमध्ये नेला. मात्र त्यांच्या 13 क्विंटल कांद्याला फक्त 1 हजार 339 रूपये भाव मिळाला. उलट गोण्या आणि मजूरीसाठी दत्ता यांनाच व्यापाऱ्याला 63 रूपये द्यावे लागले. हा सर्व प्रकार सांगताना दत्तांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना 3 मुलं आहेत. त्यातील मोठ्या मुलीच लग्न कसं करू आणि इतर दोन लेकरांना तरी कसं जगवू? असा प्रश्न ते विचारताहेत.

नांदूरघाट परिसरातील कांदा उत्पादकांची परिस्थिती ताटे यांच्यापेक्षा वेगळी नाही. युवराज खाडे यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवत 4 एकरात कांद्याची लागवड केली. यातील 6 क्विंटल कांद्याची विक्री करून खाडेंच्या हाती पडलेत 627 रुपये. यातूनच त्यांना व्यापाऱ्याला 119 रुपये द्यावे लागले. दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल. सरकारने किमान हमीभावाने कांद्याची खरेदी करावी, अशी अपेक्षा येथील कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.