पालकमंत्र्यांच्या गावातच जातपंचायतीची अघोरी प्रथा, गानगुळे कुटुंबास केले बहिष्कृत

0

निलंगा | पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या निलंग्यात जातपंचायतीची अघोरी प्रथा सुरू असल्याचे समोर आले आहे. भिल्ल वस्तीमधील गोविंद गानगुळे यांना जातपंचायतीने 50 हजार रुपयांची मागणी करीत त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केले आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून त्यांना मिळेल त्या जागी मुक्काम करावा लागत आहे.

2007 साली गोविंद यांच्या सुरेश या भावाने पंचाच्या मुलीशीच लग्न केले. व्यसनाधीन सुरेशमुळे काही वर्षातच त्याच्या संसाराची काडीमोड हा जात पंचायतीमध्येच झाला. दरम्यान, सुरेशने त्याच्या 5 ही मुलांचा सांभाळ करावा असे ठणकावून पंचाच्या मुलीला दुसरे लग्न करण्याची परवानगीही या पंचांनी दिली. एवढेच नाही तर सुरेश याला वाळीत टाकून वस्ती सोडून जाण्यास भाग पाडले.

पुन्हा काडीमोड करण्यासाठी गोविंद गानगुळे यांना 50 हजार रुपयांची मागणी केली जात आहे. येथील भिल्ल वस्तीमध्ये लक्ष्मण गंगाराम विभूते व दशरथ विभूते हे दोघेजण पंच म्हणून काम पाहतात. यापैकी लक्ष्मण यांच्या मुलींबरोबरच सुरेश गानगुळे यांचा विवाह झाला होता. आता सुरेशकडील मुले माझ्या मुलीच्या ताब्यात द्यावी या मागणीसाठी पंचायत बोलवायची असून याकरिता सुरेशचा भाऊ गोविंद याने 50 हजार रुपये द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगताच गोविंद यांच्यासह त्याच्या पत्नी आणि मुलानाही वस्तीतून बहिष्कृत करण्यात आले आहे. हा अन्याय सहन करीत जगण्यापेक्षा आता लढा देण्याचा निर्णय गानगुळे दाम्पत्याने घेतला असून न्यायाची मागणी करीत त्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.