बाराबंकी (यूपी) । उन्नाव रेप पीडितेच्या अपघातानंतर देशभरात खळबळ उडालेली आहे. एक ट्रकने पीडितेच्या कारला धडक दिली. यात पीडिता आणि वकील जखमी झाले, तर तिच्या काकू-मावशीचा मृत्यू झाला. ज्याप्रकारे हा अपघात झाला त्यावरून उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले आहेत. आता अशाच प्रश्नांनी यूपी पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहेत. एका शाळकरी मुलीने प्रश्नांची सरबत्ती करून पोलिसांची बोलती बंद केली.
बाराबंकीमध्ये यूपी पोलीस मुलींसाठी जनजागृती अभियान राबवत आहेत. या अभियानात पोलीस अधिकारी शाळांमध्ये जाऊन मुलींना सुरक्षेच्या टिप्स देत आहेत. तेवढ्यात एका मुलीने असा प्रश्न विचारला की, संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमला.

#Unnao पीड़िता के साथ जो हुआ उससे लड़कियाँ कितनी डरी हुई हैं, इस वीडियो से समझें। बाराबंकी के एक स्कूल में @Uppolice बालिका जागरूकता हेतु गई तो एक लड़की क्या बोली.@yadavakhilesh @sakshijoshii @SwatiJaiHind @BrajeshYadavSP @MLArajeshSP @pankhuripathak pic.twitter.com/aPVkz0ARkd
— Jay Prakash Yadav (@MrJPYadav) July 31, 2019
मुलीने पोलिसांना विचारले की, तुम्ही म्हणता अशा घटना घडल्यास आपण संघर्ष केला पाहिजे. पण थोड्याच दिवसांपूर्वी लखनऊमध्ये एका भाजप नेत्याने 18 वर्षांच्या तरुणीवर रेप केला, पण तिलान्याय मिळाला नाही. विद्यार्थिनी म्हणाली, तिच्या वडिलांचा मृत्यू झालाय, पण आपल्याला माहिती आहे की तो कसा झाला. या शाळकरी मुलीने पोलिसांना विचारले की, जेव्हा पीडिता तिचे नातेवाईक व वकिलासोबत जात होती, तेव्हा त्यांच्या कारला ट्रकने उडवले. तुम्ही म्हणता आम्ही प्रोटेस्ट करावा, जर समोर आम आदमी असेल तर आम्ही करू शकतो, पण जर नेता असेल तर प्रोटेस्ट कसा करावा. आम्ही प्रोटेस्ट करूनही अॅक्शन घेण्यात आली नाही तर काय होईल? आम्हाला न्याय मिळेल याची काय गॅरंटी आहे?
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनीही याबाबत ट्विट केले. त्यांनी लिहिले की, ‘जर एखादी बडी आसामी काही चुकीचे करत असेल तर त्याच्याविरुद्ध आमचा आवाज ऐकला जाईल का?’ प्रियंका पुढे लिहितात, ‘हा प्रश्न बाराबंकीच्या विद्यार्थिनीने मुलींच्या जनजागृती रॅलीत उत्तर प्रदेश सरकारला विचारला आहे. हाच प्रश्न आज उत्तर प्रदेशच्या प्रत्येक महिला, मुलीच्या मनात आहे, BJP जवाब दो?’
या शाळकरी मुलीचा प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रत्येक जण या मुलीचे कौतुक करत आहे आणि यूपी सरकार व पोलिसांनी हिच्या प्रश्नांना उत्तरे देण्याविषयी सांगत आहे.
दरम्यान, उन्नाव रेप पीडितेचा अपघात ज्या पद्धतीने झाला आहे, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.