कोरोनाच्या धास्तीने जेव्हा एका मातेचा कंठ दाटून येतो....

कोरोनाच्या धास्तीने जेव्हा एका मातेचा कंठ दाटून येतो....

उस्मानाबाद (ओंकार कुलकर्णी)  चीनमधील वुहान प्रांतातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने चीनमध्ये मोठा हैदोस घातला. ही अचानक ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अगदी या देशाच्या नाकीनऊ आले. हे संपुर्ण जगाने पाहिले, आणि बघता बघता या व्हायरसने अनेक देशांमध्ये शिरकाव केला. भारतात देखील आता हा व्हायरस आपले हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. याबाबत शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. कोरोना बाबत सरकारकडून मोठी जनजागृती देखील करण्यात येत आहे. परंतु ज्या बळीराजाला आपण आपला पोशिंदा मानतो त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरोना बाबत काही माहिती आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काल अचानक एका ग्रामीण भागात गेलो असतानाच वाटेत एक शेतकरी कुटुंब शेतात राबत असताना दिसलं. त्यांना बघून मी गाडी थांबवली आणि शेतात जाऊन त्यांची विचारपूस करीत केली. आणि बातमी कव्हर करण्यासाठी मी माझा बुम काढला आणि बातमी करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला ओपनिंग केल्यानंतर प्रश्न विचारत असतानाच त्या कुटुंबातील एका महिलेजवळ पोहोचलो. आणि त्यांना कोरोनाबद्दल काय माहिती आहे. कशी परिस्थिती आहे याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी सुरुवातीला तर व्यवस्थित उत्तर दिले. पुढे त्यांच्या मुलांविषयी विचारले असता," मुलं सून पुण्यात राहतात आणि नातवंडे देखील राहतात त्यामुळे बरीच काळजी वाटते" अस सांगताना त्या मातेचा कंठ दाटून आला. अगदी "घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी" या म्हणीप्रमाणेच पोटाची खळगी भरण्यासाठी ही माता आपल्या कुटुंबीयांसमवेत शेतात राबत ही असतानाच या मातेचे चित्त मात्र कामानिमित्त पुण्यात राहणाऱ्या आपल्या मुलाबाळांमध्ये गुंतलेले होते. पत्रकारितेत आल्यानंतर पहिल्यांदाच हे सर्व घडतं होत. त्यामुळे मी ही पहिल्यांदाच अगदी काही क्षणात भावुक झालो. मात्र मी स्वतःला सावरल आणि पुढे जाऊन कसबस शूट संपवल.

त्या मातेचा उतरलेला चेहरा पाहून खूप वाईट वाटले. कारण एकवेळ वाटलं की "अरे आपलंच चुकलं?" म्हणून अपराधीपणाची भावना काहीवेळ मनात तयार झाली तसच मग त्यांचा निरोप घेतला. घरी परतत असतांना माझ्या डोक्यात सतत हाच विचार सुरू होता. माझा उतरलेला चेहरा बघून आईने काय झालं म्हणून विचारलं. तेव्हा जे काय घडलं ते सगळं मी आईला सांगितलं. तेव्हा आई म्हणाली की, " तुझं काही चुकलं नाही उलट तू हे काम करून त्या आईच मन मोकळं केलंस" हे आईच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून जरा बर वाटलं. थोडा विचार केल्यानंतर त्या मातेच्या मनात घर केलेल्या ज्या भावना होत्या त्या बाहेर आल्या व त्या मातेचं दुःख हलकं केलं. याचा अभिमान देखील वाटला, पत्रकार हा समाजाचा आरसा आहे अस ऐकलं होतं आणि तेच काम आपण केल्यामुळे शेवटी माझं मनही हलक झालं.

गेल्या काही दिवसांपासून या कोरोना विषयी जनजागृती व उपाययोजना करण्याचे काम शासकीय पातळीवर केलं जातं आहे. मात्र आपण मात्र त्याच कोरोनाबद्दल समाज माध्यमांवर जोक्स आणि व्हिडीओ शेअर करून टिंगल टवाळी करतो आहे. हे सर्व सोडून आपण सर्वांनी मिळून कोरोना विषयक काळजी घेऊन लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. कारण थोरमोठे म्हणून गेले की "प्रयत्नांती परमेश्वर"AM News Developed by Kalavati Technologies