लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध ठेवण्यावर सुप्रीम कोर्टानं दिला 'हा' महत्त्वाचा निकाल

परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली । परस्पर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 'ज्या संबंधांतून भविष्यात लग्न होणार नाही, हे माहिती असतानाही महिलेनं सहमतीनं एखाद्या पुरुषासोबत ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही', असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. यासंदर्भात एका महिलेनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टानं हा मोठा निर्णय दिला आहे.

असे आहे प्रकरण...

सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमाडंट असलेल्या अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप विक्रीकर विभागातील सहायक आयुक्त महिलेने केला होता. तक्रारदार महिला सीआरपीएफमध्ये असलेल्या या अधिकाऱ्याला 1998 पासून ओळखत होती. 2008 मध्ये त्यानं लग्नाचे आश्वासन देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप या महिलेने केला; परंतु 2014 मध्ये त्या व्यक्तीनं महिलेला लग्नास नकार दिला. यानंतरही 2016पर्यंत दोघांचेही प्रेमसंबंध सुरूच होते; पण संबंधित अधिकाऱ्यानं काही दिवसांनंतर दुसऱ्या महिलेसोबत साखरपुडा केल्याची माहिती मिळताच महिलेनं त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दोघांमधील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधांदरम्यान दोघेही सहमतीनं शारीरिक संबंध ठेवत होते. या संबंधांतून भविष्यात काहीही साध्य होणार नाही, हे महिलेला माहिती असतानाही तिनं शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे यास बलात्कार म्हणता येणार नाही, असं म्हणत न्यायालयानं महिलेची याचिका फेटाळली.AM News Developed by Kalavati Technologies