बीड । फेसबुकवरून झालेल्या मैत्रीच्या मानसिक त्रासातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या धारूर तालुक्यातील कासारी फाटा येथे घडली आहे. दिपक सुभाष सांगळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सदरील घटना ही फेसबुक मैत्रीच्या मानसिक तणावातून झाल्याचे समोर आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी दिपकची आरती नावाच्या विवाहित महिलेसोबत फेसबुकवर मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरतीने दिपकला लग्नासाठी तगादा लावला. त्यानंतर माझ्याशी लग्न कर, शेती व ट्रक नावावर कर असे म्हणून तिने त्यास मानसिक त्रास दिला. तिच्या सततच्या त्रासाला कंटाळून दिपकने शुक्रवारी दि. 4 रोजी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
दिपक सांगळे हा अविवाहित व कुटूंबातील एककुलता एक मुलगा होता. स्वत:च्या मालकीचा ट्रक चालवून तो कुटुंबाला हातभार लावत असे. मयत दिपक याची बहीण शीतल दिगांबर घुगे (रा.चिंचपूर ता.धारुर) यांनी सोमवारी धारुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यासंबधी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असुन पुढील तपास प्रदीप डोरले करत आहेत