ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार लीलाताई मर्चंट यांचे दु:खद निधन

परदेशी वस्तूंची होळी, हरिजन मंदिर प्रवेश, अस्पृश्यता निवारण इथपासून ते भूदान कार्यापर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

पुणे । ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि काँग्रेसच्या माजी आमदार लीलाताई मर्चंट यांचे दु:खद निधन झाले. मृत्युसमयी त्या 95 वर्षांच्या होत्या. लीलाताई मर्चंट यांचा जन्म तळेगाव ढमढेरे येथे दि. २४ मार्च १९२४ रोजी झाला होता. बालपणापासूनच त्यांना गोरगरिबांविषयी आत्मीयता, सेवाभावी वृत्ती व सामाजिक बांधिलकीचे बाळकडू मिळाले. भारताला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याच्या ससून रुग्णालयात डॉ. रतिलाल मर्चंट काम करत होते. त्यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांनी लीलाताईंच्या समाजकार्याला प्रोत्साहनच दिले.

डॉ मर्चंट यांचा साने गुरुजींशी स्नेहसंबंध होते. त्यामुळे लीलाताईंनाही साने गुरुजींचा सहवास मिळाला. त्यामुळे १९४२च्या 'छोडो भारत' आंदोलनात लीलाताई मर्चंट यांनी भूमिगतांसाठी काम केले. परदेशी वस्तूंची होळी, हरिजन मंदिर प्रवेश, अस्पृश्यता निवारण इथपासून ते भूदान कार्यापर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने सुरू केलेली सूतकताई लीलाताई अखेरपर्यंत जपली. स्वातंत्र्य चळवळीतील आणि सामाजिक क्षेत्रांतील त्यांच्या कामामुळे त्यांवा जवाहरलाल नेहरू, धोंडो केशव कर्वे, लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या मोठ्या लोकांशी त्यांचा संबंध आला.

पुणे शहरात आलेला पानशेतचा पूर, दुष्काळ, भूकंप, दंगली, जाळपोळ अशा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी लीलाताई मर्चंट सर्वसामान्यांच्या आधारवड झाल्या. महिला व गरीब लोकांसाठी त्यांनी केलेल्या समाजसेवेमुळे लीला मर्चंट यांना पुणेकरांनी १९६२ आणि १९६८च्या निवडणुकांत महापालिकेवर निवडून दिले. पुण्याच्या महापालिकेवर निवडून जाणाऱ्या गुजराती-मारवाडी समाजातील त्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर पुण्याच्या कसबा मतदारसंघातून त्या काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरही त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना ओळखले जाते.AM News Developed by Kalavati Technologies