Independence Day Special: स्वातंत्र्यलढ्यातील 10 रणरागिणी, ज्यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केला

स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिला स्वातंत्र्यसैनिकांचा अल्पपरिचय

15 ऑगस्ट 2019 रोजी 73वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, मोठा त्याग केला अशा महान स्वातंत्र्यसैनिकांबद्दल सर्व भारतीयांच्या मनात अपार श्रद्धा आहे. स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांइतकेतच महिलांनीही सर्वस्व अर्पण केले होते. या लढ्यातील बहुतांश रणरागिणींची अनेकांना माहिती नाही. स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अशाच काही प्रातिनिधिक महिलांचा हा अल्पपरिचय देत आहोत.

राणी लक्ष्मीबाई
महिला सबलीकरणाची जेव्हाही चर्चा होते तेव्हा राणी लक्ष्मीबाईंचे नाव आवर्जून घेतले जाते. 1857च्या देशाच्या पहिला स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांच्या अप्रतिम शौर्यामुळे इंग्रजांनीही त्यांची प्रशंसा केली होती. त्यांच्या शौर्याचे किस्से आजही सांगितले जातात.

दुर्गाबाई देशमुख
दुर्गाबाई देशमुख महात्मा गांधींच्या विचारांमुळे अत्यंत प्रभावित होत्या. त्यांनी महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनात सहभाग घेतला आणि भारताच्या स्वातंत्र्यात एक वकील, सामाजिक कार्यकर्ता आणि एक राजकीय नेत्या म्हणून सक्रिय सहभाग नोंदवला. स्वातंत्र्यानंतर लोकसभेच्या सदस्य बनल्या. पुढे योजना आयोगाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी मोलाची कामगिरी केली.

लक्ष्मी सहगल
व्यवसायाने डॉक्टर राहिलेल्या लक्ष्मी सहगल यांनी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. लक्ष्मी सहगल यांनी सन 2002 च्या राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेतला होता. तेव्हा ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली होती. त्यांचे पूर्ण नाव लक्ष्मी स्वामीनाथन सहगल होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या त्या अनुयायी होत्या. इंडियन नॅशनल आर्मीमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. 1998 मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

विजया लक्ष्मी पंडित
भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित याही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत्या. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना कैद झाली होती. भारताच्या राजकीय इतिहासात त्या पहिल्या महिला मंत्री बनल्या होत्या. संयुक्त राष्ट्रांत त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा होत्या तसेच स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूतही होत्या. त्यांनी मॉस्को, लंडन आणि वॉशिंग्टनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

सुचेता कृपलानी
सुचेता कृपलानी यांनी फाळणी आणि दंग्यांच्या काळात महात्मा गांधींसोबत राहून कार्य केले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यावर त्यांनी राजकारणातही प्रमुख भूमिका निभावली. भारतीय संविधानासाठी गठित संविधान सभेच्या ड्राफ्टिंग समितीच्या सदस्याच्या रूपात त्यांची निवड झाली होती. त्यांनी संविधान सभेत 'वंदे मातरम'ही गायले होते. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली होती.

उषा मेहता
सीक्रेट काँग्रेस रेडिओ’या नावानेही त्यांना ओळखले जात होते. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान या काँग्रेस रेडिओने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासाठी त्यांना पुण्याच्या येरवाडा तुरुंगात कारावास पत्करावा लागला होता. महात्मा गांधींच्या अनुयायी राहिलेल्या उषा मेहता यांना स्वातंत्र्यसंग्रामात त्यांच्या अमूल्य योगदानासाठी ओळखले जाते.

सरोजिनी नायडू
भारतीय कोकिळा या नावाने प्रसिद्ध सरोजिनी नायडू फक्त स्वातंत्र्यसैनिकच नव्हे तर उत्तम कवयित्रीसुद्धा होत्या. खिलाफत आंदोलनाची कमान सांभाळून सरोजिनी नायडू यांनी ब्रिटिशांचे भारतातून जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कस्तुरबा गांधी
मोहनदास करमचंद गांधीजींनी स्वत: म्हटले होते की, कस्तुरबांची दृढता आणि साहस खुद्द गांधीजींपेक्षा उन्नत होते. स्वातंत्र्याच्या संग्रामात महात्मा गांधींची त्यांनी प्रत्येक पावलावर साथ दिली. स्वातंत्र्यासाठी त्यांनीही कित्येकदा तुरुंगवास भोगला. दृढ आत्मशक्ती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते.

कमला नेहरू
जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला यांचे कमी वयातच लग्न झाले होते. परंतु वेळ आल्यावर अतिशय शांत स्वभावाच्या कमला नेहरू आयर्न लेडी सिद्ध झाल्या. अनेक धरणे-आंदोलने, मोर्चांमध्ये त्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. उपोषणे केली, तुरुंगवासही भोगला. असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता.

अरुणा असफ अली
अरुणा असफ अली यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत सक्रिय कार्यकर्त्या म्हणून ओळखले जाते. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात सहभागी होऊन लोकांना आपल्यासोबत जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासोबतच ‘इंडियन नॅशनल काँग्रेस'च्या त्या सक्रिय सदस्याही होत्या. स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'इन्कलाब' या मासिकाच्या त्या संपादकही होत्या. सन 1998 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.AM News Developed by Kalavati Technologies