सावधान! मुंबईत महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, रात्रीच्या प्रवासात महिलेला आला कटू अनुभव

राजधानी मुंबईत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

मुंबई । उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामुहिक बलात्कारामुळे निष्पाप मुलीचा नाहक बळी गेला. ही घटना ताजी असताना मुंबईत एका महिला पत्रकारास कटू अनुभव आला आणि त्यामुळे महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्री एकट्याने प्रवास केल्यानंतर त्या महिला पत्रकाराला धमकावत सकाळी कॉल आला आणि 'तू अर्धा तास ओला थांबवून ठेवलीस, वाहन चालकाला मारहाण केलीस, म्हणून वाहन चालकाने तुझ्याविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार केली' असल्याची बतावणी करणारा कॉल आहे. तिला बीकेसी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले गेले. बोगस पोलीस अधिकारी बोलून बतावणी करणाऱ्या त्या व्यक्तीविरोधात संबंधित महिला पत्रकाराने ट्विटरद्वारे मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. पण काही वेळानंतरच महिला पत्रकाराने केलेला ट्विट ट्विटरवर दिसेनासा झाला आहे.

महिला पत्रकारांची प्रतिक्रिया


“माझी मुंबई” महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न मला पडलाय. काल रात्री मला खूप वाईट आणि अंगावर काटा आणणारा अनुभव आला. कोरोना महामारीत मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल बंद असल्याने, तुम्ही जर ओला कॅब बुक करत असाल आणि एकट्याच आहात तर सावधान... काल रात्री १२. ३० वाजताच्या सुमारास ओला कॅब बुक केली. ५ ते १० मिनिटात मी ओलाने घर गाठलं. रात्री एकटी प्रवास करत असताना सुरक्षितता म्हणून माझ्या मोबाईलवरून प्रवास संपेपर्यंत सतत बोलत होती. जर कॉल सुरु ठेवला नसता, तर मला कालची रात्र दुर्दैवी, काळी रात्र पाहावी लागली असती. माझ्यासोबत काहीही घडलं असतं, नुसती कल्पना करूनच अंगावर काटा येतो.

घरी आले.. रात्र गेली... सकाळी उठले... दिनक्रम सुरु झाला. सकाळी ११.३० ते १२ वाजताच्या दरम्यान १० ते १५ अज्ञात क्रमांकाहून कॉल आलेले पाहून मी हडबडले. पुन्हा फोन आला आणि मी तो रिसिव्ह केला. 'मॅडम आपने कल रात १२.३० बजे ओला बुक किया था. आपके खिलाफ बीकेसी पोलीस स्टेशन में कम्प्लेंट आयी है.' माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी म्हणाले. मग, त्यावर समोरून लबाड माणूस म्हणाला 'आपने ओलावाले को आधा घंटा रुकाया और ड्राइव्हर धर्मराज वर्मा को गालीगलोच की!, आपको बीकेसी पोलीस स्टेशन आना होगा'. मी म्हणाले 'आप कौन आपका नाम क्या' समोरून उत्तर आले 'मै पोलीस इन्स्पेक्टर हू' त्याने दबक्या आवाजात सांगितलेलं नाव समजलं नाही.

तीन वेळा मी विचारलं. तरीसुद्धा समजलं नाही. मी विचारले तुझा सिनिअर कोण? त्याचे उत्तर सुद्धा तो दबक्या आवाजात उत्तरला. या प्रकारावरून मला ऐक गोष्ट लक्षात आली. कोणीतरी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. जे महत्वाचे आहे, मुद्याचे आहे ते हळू बोलले जात आहे आणि मला घाबरवणारी वाक्ये मोठ्याने आणि स्पष्ट बोलली जात आहेत. बस इतकं लक्षात आल्यानंतर, मी त्याला 'तु गेम खेल रहा है क्या, रुक तु गेम तुने शुरु किया ना, अब मैं खतम करती हु' इतकं म्हणेपर्यंत त्याने फोनच ठेवला. याबाबत मी ओला कॅब, मुंबई पोलिसांना, काही राजकीय मान्यवरांना या घटनेची माहिती ट्वीट करुन दिली. त्यानंतर काही मित्र-मैत्रीणींना माझे ट्विटच दिसेनासे झाले. कोणीतरी ते ट्वीट डिलीट केले असावे.

पुढे त्या म्हणाल्या, मी पुन्हा रि-ट्विट केलं. ओलाने माफीनामा पाठवला. दरम्यान त्यांच्या सेफ्टी पिन मॅनेजरचा फोन आला. आपल्या ड्रायव्हरची चौकशी न करता त्याने माझ्याकडून माहिती जाणून घेतली. त्यात मी त्याला समोरुन (त्याने न मागता) कॉल रेकॉर्ड, फोटो, स्क्रीन शॉट, पिकअप आणि ड्रॉप लोकेशनचे फुटेज समोरुन देऊ केले. पण पाहतो असे मोघम उत्तर मला फोनवर सांगितले आणि तुम्ही 100 डायल करा आणि बीकेसी पोलीस ठाण्यास कॉल करून त्या व्यक्तीची माहिती काढा असा अवाजवी सल्ला दिला. एक महिला रात्री एकटी असताना तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणे, रात्री बाहेर निघणाऱ्या, दिसणाऱ्या महिला या वाईट काम करणाऱ्या असतात, या पुरुषी मानसिकतेला कोठेतरी आळा बसायला पाहिजे.

ओला कॅब सेवा मी अनेक वेळा वापरली, मात्र असा वाईट अनुभव पहिल्यांदा आला. ओलाचा माफीनामा पुरेसा नाही असे मला वाटते. माझ्या इभ्रतीस धक्का लागला असता (कोरोनामुळे रस्ते निर्मनुष्य आहेत), ओला कॅबने भरून दिली असती का. निर्मनुष्य स्थळी बीकेसीला बोलावून (पोलीसाच्या नावाने) ड्राइव्हरने काय कट आखला असेल याची कल्पना करा फक्त. माझ्याकडून पैसे लुबाडले असते आणि माझा विनयभंग केला असता, तर याची जबाबदारी ओलाने घेतली असती का?, तसेच ओला कॅब मी बुक केली याविषयी कॉल करणाऱ्या अज्ञाताला माझ्या कॉलविषयी जी ओलाची माहिती आहे, ती कशी काय मिळाली, रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना लुटणारे रॅकेट तर हे नाही ना? असा संशय मनात येत असून या सगळ्या विरुध्द मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ठरवले आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी मला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा करते असे त्या म्हणाल्या. ओलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाही.AM News Developed by Kalavati Technologies