Inspiring । नक्षलग्रस्त भागातील पहिली महिला पायलट, अनुप्रिया लाक्रावर कौतुकाचा वर्षाव

आदिवासी भागातील पहिली महिला व्यावसायिक पायलट बनून अनुप्रियाने इतिहास रचला आहे.

मलकानगिरी (ओडिशा) । ओडिशाच्या नक्षलग्रस्त मलकानगिरी जिल्ह्यातल्या 27 वर्षीय अनुप्रिया लाक्राने मागास भागातून पहिली महिला पायलट बनून इतिहास रचला आहे. अनुप्रिया लवकरच को-पायलट म्हणून एका खासगी विमान कंपनीत रुजू होणार आहे. अनुप्रियाने अनेक वर्षांच्या कष्टानंतर हे देदीप्यमान यश मिळवले आहे. पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने वयाच्या 23व्या वर्षी अभियांत्रिकी सोडून एव्हिएशन अकॅडमीमध्ये जाण्याचे ठरवले.

तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शुभेच्छा व्यक्त करताना ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, इतरांनी अनुकरण करण्याच्या उदाहरणाद्वारे लाक्रा प्रेरणा बनल्या आहेत.
पटनायक यांनी ट्विट केले की, “अनुप्रिया लाक्राच्या यशाबद्दल मला आनंद झाला आहे. समर्पित प्रयत्न व चिकाटीने तिने मिळविलेले यश हे पुष्कळांसाठी एक उदाहरण आहे.” ओडिशा पोलिसांतील हवालदाराची कन्या असलेल्या अनुप्रिया लाक्रा हिने मलकानगिरी येथील कॉन्व्हेंटमधून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सेमिलीगुडा येथील शाळेतून पूर्ण केले.

तिच्या पालकांना तिच्या या यशाचा अत्यंत अभिमान आहे. ते म्हणाले की, तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. या पातळीवर पोहोचण्यासाठी तिने खूप कठीण संघर्ष केला. गृहिणी असणाऱ्या अनुप्रिया लाक्राच्या आई यशमीन लाक्रा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, "लोक आम्ही मागास भागातील असल्याने तिला हे जमणार नाही असे म्हणायचे. परंतु तिने त्यांना चुकीचे सिद्ध केले आहे. आम्हाला तिचा अभिमान वाटतो." अनुप्रिया म्हणते की, संपूर्ण कुटुंब तिच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. आदिवासी भागातील पहिली महिला व्यावसायिक पायलट बनल्याबद्दल सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies